माझा डॉक्टर बनून मैदानात उतरा

माझा डॉक्टर बनून मैदानात उतरा

कोविडविरुद्धच्या या लढाईमध्ये अनेक डॉक्टरांनी आपले प्राण देखील गमावले

कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची असून सर्वसामान्यांसाठी आपण माझा डॉक्टर बनून मैदानात उतरा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित कार्यपद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.

केवळ काही डॉक्टर्सशी न बोलता तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणार्‍या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सूचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. यावेळी बोलताना ठाकरे यांनी डॉक्टरांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

घरी उपचारातील रुग्णांकडे लक्ष हवे
लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात. यामुळे खर्‍या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो. त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तात्काळ उपचार सुरू केल्यास वेळीच रुग्ण बरा होण्यास मदत होईल, असे ठाकरे म्हणाले.

सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणार्‍या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळताहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे. तसेच वॉर्ड अधिकार्‍यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोविड उपचार केंद्रांमध्येही सेवा द्या
आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

टास्क फोर्सने केले शंकांचे निरसन
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित तसेच डॉ. तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. कोरोनाची लक्षणे फसवी असतात. त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

First Published on: May 10, 2021 4:30 AM
Exit mobile version