खोबर महागलं ! किचनच्या बजेटला फोडणी

खोबर महागलं ! किचनच्या बजेटला फोडणी

खोबऱ्याचा दर वाढला

आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या जेवणातल्या प्रत्येक डिशला चव आणणारे खोबरे येत्या दिवसात महाग होणार आहे. केंद्र सरकारने नुकताच खोबऱ्याच्या हमीभावात वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती बजेटमध्ये आता महागाईची फोडणी मिळणार आहे. येत्या दिवसांमध्ये ग्राहकांना खोबऱ्यासाठी जास्त पैसे मोजण्याची वेळ येणार आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार आता खोबऱ्याची बाजारातील किंमत वाढणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र या वाढीचा फटका बसणार आहे. घरगुती मसाल्यांसोबत खोबऱ्याचे अधिकच महत्व आहे. म्हणूनच आता खोबऱ्याच्या प्रत्येक वाटीसाठी ग्राहकाच्या खिशाला कात्री लागणार आहे. सर्वसाधारण दर्जाच्या वाटी खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क़्विटल 9,521 वरून 9,960 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर संपूर्ण खोबरे डोलची किंमत प्रति क़्विटल 9,920 वरुन 10,300 रुपये एवढी केली आहे. यामुळे खोबरे उत्पादकांना वाटी खोबऱ्यावर क़्विटलमागे 439 रुपये तर खोबरेडोलावर क़्विटलमागे 380 रुपयांचा लाभ होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 2020 या वर्षाच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान हमीभावाला मंजुरी देण्यात आली. कृषी उत्पादने खर्च आणि किंमत आयोगाच्या (CACP). शिफारशींवर आधारित हा हमीभाव देण्यात आला आहे. देशातील कृषी उत्पादनांच्या खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या तत्वावर हा हमीभाव वाढवण्यात आला आहे. खोबरे उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

म्हणून झाली वाढ

देशभरात तयार होणाऱ्या खोबऱ्याचा सरासरी उत्पादन खर्च लक्षात घेऊन वाटी खोबऱ्याच्या उत्पादनातील 50 टक्के खर्च आणि खोबरे डोल उत्पादनातील 55 टक्के खर्च भरून निघावा, या उद्देशाने हा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.

First Published on: March 14, 2020 2:38 PM
Exit mobile version