माथेरान, सुधागडमध्ये थंडीचा कडाका!

माथेरान, सुधागडमध्ये थंडीचा कडाका!

समुद्र सपाटीपासून 803 मीटर उंचीवर असलेले गिरिस्थान माथेरान गेले काही दिवस गुलाबी थंडीने गारेगार झाले आहे. ठिकठिकाणांहून आलेले पर्यटकही कमालीचे सुखावले आहेत. शहराचे तापमान सध्या 10.2 अंशावर आले आहे. दरम्यान, सुधागड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे.

काही दिवसांपासून मिनी ट्रेन शटल सेवा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला येत आहेत. गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी येणार्‍यांची संख्या रोज वाढत आहे. पारा 10.2 अंशावर गेल्यामुळे स्थानिक, तसेच पर्यटक स्वेटर, मफलर, कान टोपीचा सहारा घेत नाक्यानाक्यावर शेकोटी पेटवून मजा घेताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांतील हे निचांकी तापमान आहे.

सुधागडाचा पारा घसरला
सुधागड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात हळूहळू बदल होऊ लागल्याने तापमानाचा पारा खाली येत थंडीचा कडाका वाढू लागला आहे. १2 ते १3 डिग्रीपर्यंत पारा खाली गेला असल्याने तालुका गारठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थंडीचे आगमन तब्बल एक महिना उशिरा झाले. मात्र ‘देरसे आये दुरुस्त आये’ या उक्तीप्रमाणे थंडीने मागची कसर भरून काढत सर्वांनाच गारठवून टाकले आहे. थंडीचा कडाका वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी उशिरापर्यंत आणि सायंकाळी ७ वाजल्यानंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. थंडीचा जोर चांगलाच वाढल्याने अनेकांनी जागोजागी शेकोट्या पेटवल्या आहेत. सकाळी लवकर, तसेच रात्री जागोजागी शेकोट्या दिसत असून त्याच्याभोवती बसून गप्पांच्या मैफिली रंगत आहेत. शहरासह परिसरात पहाटे दाट धुके पडत असल्याने वाहनांच्या वेगाला आपोआप ‘ब्रेक’ लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी, चाकरमानी यांना शाळेत, तसेच कार्यालयात पोहचण्यास उशीर होत आहे. दिवसाचे वातावरणही थंड रहात असल्याने अनेकजण स्वेटर, जॅकेट, मफरल, उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत. थंडीचा जोर अधिक वाढला तर आंबा, तसेच रब्बी पिकाला हानी पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माथेरानमधील तापमान केंद्रात दररोज तापमानाची नोंद केली जाते. शनिवारी सकाळी तापमानाची नोंद 10.2 अंश होती. 1994 नंतरचे हे सर्वात निचांकी तापमान असून, पुढील काही दिवसांत तापमान यापेक्षाही खाली येऊ शकते. -अन्सार महापुळे, तापमान निरीक्षक

First Published on: January 19, 2020 1:17 AM
Exit mobile version