सुनील तटकरे, पार्थ पवार, अनंत गीतेंना आयोगाची नोटीस

सुनील तटकरे, पार्थ पवार, अनंत गीतेंना आयोगाची नोटीस

राज्य निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाची परवानगी न घेता समाजमाध्यमांवर जाहिरात पोस्ट करून आचारसंहिता भंग केल्याबद्दल रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे, शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी स्पष्टीकरण करण्याबाबात नोटीस पाठवली आहे. मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना पेड न्यूजबाबत खुलासा करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.

निवडणुकीत जाहिरात, सभा, दौरे याचे नियोजन करताना माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी यांची परवानगी घेऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी पक्षाने घेणे गरजेचे आहे. तसे न करता समाजमाध्यमांवर निवडणुकीचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे.

‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा’ ही बातमी व त्यांच्या प्रचारार्थ गाव दौर्‍यांना सुरूवात ही एकसारखा मजकूर असलेली बातमी काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या बातम्या पेड न्यूजमध्ये मोडत आहेत. याबाबत या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करू नये, असा खुलासा उमेदवारास विचारून कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा, याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे.

खेडचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गौसभाई खतीब यांनी फेसबुक या सोशल साईटवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन मुस्लीम समाजातील पुरुष-महिला मतदारांना केले आहे. विशिष्ट समाजाला, जातील उद्देशून आवाहन करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी फेसबुक या सोशल साईटवर पक्षाच्या लोगोसह कार्यकुशल नेतृत्त्व हेच रायगडचे भविष्य ही जाहिरात पोस्ट केली आहे. या दोन्ही प्रकाराबाबत तटकरे यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे.

शिवसेना रायगड यांनी फेसबुकवर उमेदवार अनंत गीते यांच्या पक्षाच्या लोगोसह कार्यकर्ता मेळावा व निष्कलंक खासदार अशी जाहिरात पोस्ट केली आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून शिवसेना उमेदवार अनंत गीते यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे

First Published on: April 4, 2019 4:12 AM
Exit mobile version