पूरग्रस्तांच्या कर्जमाफीवर शासनाचा सुधारित निर्णय, आता सर्व पिकांवरील कर्ज माफ!

पूरग्रस्तांच्या कर्जमाफीवर शासनाचा सुधारित निर्णय, आता सर्व पिकांवरील कर्ज माफ!

पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमध्ये महापुरानं घातलेल्या थैमानानंतर राज्य सरकारने राज्यभरात जुलै २०१९ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात निर्णय घेतला होता. या कालावधीमध्ये खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी या पिकांवरचं कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या निर्णयात सरकारने सुधारणा केली असून या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या सर्वच पिकांवरचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयिकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका अशा पतपुरवठा माध्यमातून घेतलेलं कर्ज या निर्णयानुसार माफ होणार आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या भात, भुईमूग, ऊस, सोयाबीन या पिकांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे.


खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

अजूनही पूरग्रस्त भागामध्ये कामं सुरू

दरम्यान, कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील यातून नुकसान भरपाई मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांना सर्वसाधारण नुकसानभरपाईच्या ३ पट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. याशिवाय अजून काही महिने पूरग्रस्तांना मोफत धान्य पुरवठा करणे, शेतांमध्ये साचलेला गाळ काढणे, नुकसान झालेल्या घरांची दुरूस्ती करणे, शेती पुन्हा लागवडीयोग्य करणे अशा प्रकारची कामं पूरग्रस्त भागामध्ये सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

First Published on: August 28, 2019 8:17 AM
Exit mobile version