आदित्य ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, एसआरपीएफ जवानांच्या बदलीसाठी सेवेची अट आता १२ वर्षे

आदित्य ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, एसआरपीएफ जवानांच्या बदलीसाठी सेवेची अट आता १२ वर्षे

आदित्य ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, एसआरपीएफ जवानांच्या बदलीसाठी सेवेची अट आता १२ वर्षे

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरुन आता १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण अदित्या ठाकरे यांनी केलेल्या पाठपुरव्याला अखेर यश आले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरून २ वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल मंत्री आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयासाठी मंत्री ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरून एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली असून यामुळे कर्तव्य बजावण्याबरोबरच एसआरपीएफ जवानांची सोय होणार आहे.

या निर्णयाबद्दल मंत्री श्री. ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांचेही आभार मानले आहेत.

First Published on: May 12, 2021 4:37 PM
Exit mobile version