मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळयांना सशर्थ परवानगी

मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळयांना सशर्थ परवानगी

कोरोना संसर्गामुळे मंगल कार्यालयांना लॉकडाउन केले होते. त्यामुळे अनेकांना आपल्या घरातच कमी उपस्थितीत विवाह सोहळे उरकावे लागले. मात्र पोलिस आयुक्तांनी आता ५० व्यक्तींच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात लग्न करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भातील आदेश ५ एप्रिल रोजी पारित करण्यात आले आहेत. मात्र विवाह सोहळयांचे आयोजन करतांना कठोर निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे शासनाने लॉकडाउन केल्याने गेल्यावर्षी लॉकडाउन करण्यात आल्याने मंगल कार्यालये, लॉन्स, बँक्वेट हॉल चालकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्हयाचा विचार करता या क्षेत्राचे सुमारे तिनशे कोटी रूपयांचे नुकसान झाले. यंदा हळूहळू विवाह सोहळयांना सुरूवात झाल्याचे अर्थचक्र गतीमान झाले होते मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने पुन्हा निर्बंध लादण्यात आले. यात प्रामुख्याने विवाह सोहळयांना होणारया गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आल्याने आयोजक तसेच मंगल कार्यालया चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात करण्यात आली. विवाह सोहळयांवर निर्बंधही टाकण्यात आले मात्र संसर्ग आटोक्यात येत नसल्याने अखेर मंगल कार्यालयांत विवाह सोहळयांना बंदी घालण्यात आली. याबाबत मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन शासनाकडे पाठपुरावा करून ५० लोकांच्या उपस्थितीत नियमांचे पालन करून लग्न करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. अखेर याबाबत परवानगी देण्यात आली आहे.

प्रशासनाचे आदेश प्राप्त होताच मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन तसेच विवाह विषयक सेवा देणार्‍या सर्व असोसिएशनची बुधवारी तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक होऊन त्यामध्ये आदेशा संदर्भात सखोल चर्चा झाली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून व नियमाप्रमाणे मर्यादित लोकांच्या उपस्थित विवाह बुकिंग करून घेणे व झालेल्या बुकिंगचे विवाह ठरलेल्या तारखांना शासकीय नियमानुसार संपन्न करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. सभेमध्ये लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चोपडा, वेडिंग फेडरेशनचे अध्यक्ष संदीप काकड, उपाध्यक्ष उत्तमराव गाढवे, केशवराव डिंगोरे,मंगल कार्यालय असोसिएशनचे सेक्रेटरी शंकरराव पिंगळे, सह सेक्रेटरी समाधान जेजुरकर,खजिनदार भाऊसाहेब निमसे, विक्रांत मते, जितेंद्र राका, सुरेंद्र कोठावळे,प्रसाद पोरजे, बाळासाहेब तांबे, सचिन भोर, निलेश मकर, देवदत्त जोशी, अनिल जोशी, योगेश खैरनार हे पदाधिकारी उपस्थित होते.

असोसिएशनने जाहीर केली नियमावली
* मंगल कार्यालय चालकांनी नियमांचे पालन न केल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल
* सोशल डिस्टंसिंग, हॉल व रूमचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
* नो मास्क नो एन्ट्री तसेच येणार्‍या प्रत्येक पाहुण्याचे तापमान घ्यावे.
* केवळ ५० व्यक्तींनाच प्रवेश
* समारंभ परवानगी करिता फार्म नंबर 6 ची पूर्तता करावी
* पोलिस परवानगी शिवाय कुठलाही कार्यक्रम कार्यालयात करू नये

मंगल कार्यालयांमध्ये ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळयांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु याकरीता पोलिस परवानगी आवश्यक आहे. आठवडयाच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवार विवाह समारंभ असेल तर परिस्थिती पाहून परवानगी दिली जाईल. समारंभास येणारया प्रत्येक आमंत्रितांची कोरोना चाचणी रिपोर्ट असणे अनिवार्य असेल. कोरोना चाचणी न केलेले आढळून आल्यास संबधितांवर एक हजार तर आस्थापला मालकांवर दहा हजार रूपयांचा दंड आकारला जाईल.
सीताराम कोल्हे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

एप्रिल, मे महिन्यात विवाह सोहळयांच्या तारखा आहेत मात्र अशातच लॉकडाउन झाल्याने मंगल कार्यालय व यावर आधारित सर्व घटकांचे अर्थचक्र थांबले होते. मात्र आता ५० लोकांच्या उपस्थितीत परवानगी दिल्याने नियमांचे पालन करून सर्व समारंभ आयाजित केले जातील याकरीता असोसिएशनच्यावतीनेही नियमावली तयार करण्यात आली आहे.
अनिल चोपडा, अध्यक्ष मंगल कार्यालय असोसिएशन

प्रशासनाने कार्यालयांना नियमांच्या अधिन राहून समारंभांना परवानगी दिल्याने असोसिएशनने स्वतःची नियमावली तयार केली आहे. त्यानूसार सर्व सभासदांना विवाह समारंभाचे आयोजन करावे लागेल. प्रशासनाला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे आमचे सर्व सभासद नियमांचे पालन करतील.

समाधान जेजुरकर, सह सेक्रेटरी, मंगल कार्यालय असोसिएशन

First Published on: April 7, 2021 2:34 PM
Exit mobile version