मॉन्सून कोकणाकडे सरकतोय; मुंबईमध्ये पुन्हा कोसळधार

मॉन्सून कोकणाकडे सरकतोय; मुंबईमध्ये पुन्हा कोसळधार

मुंबईमधील पावसाचे संग्रहित छायाचित्र

कर्नाटकच्या सीमेपर्यंत पोहोचलेले नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे सरकण्यास अनुकुल स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले असून येत्या ४ ते ५ दिवसांत मॉन्सूनचा पाऊस गोवा आणि दक्षिण कोकणाकडे पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला अजूनही मॉन्सूच्या पावसासाठी किमान आठवडाभर तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आज दुपारी प्रसिद्ध केलेल्या अंदाजाप्रमाणे मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, दक्षिण कोकणातील काही भाग, आंध्र प्रदेश, तमिळनाडूचा उर्वरित भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्य भारतातील उर्वरित प्रदेशात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यास येत्या ४ ते ५ दिवसांत अनुकुल स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच वायू वादळ कमकुवत झाले असून उत्तर पूर्वेकडे १३ किलोमीटर प्रतितास या वेगाने सरकत आहे. त्यामुळे गुजरातला त्याच्यापासून असलेला संभाव्य धोका आता जवळपास संपुष्टात येत असून त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान  पुढील २४ तासांत बंगालच्या उत्तरपश्चिम खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचा जोर वाढून ओडिसाच्या किनापट्टीजवळ १९ जून रोजी एक चक्रवाती प्रणालीत रूपांतरित होईल. ह्या प्रणालीचा कार्यकाळ जास्त नसेल आणि अंशतः जमीन व समुद्रावर राहणार आहे. जमिनीवर आल्यानंतर, ओडिसा आणि आंध्रप्रदेशच्या आसपासच्या भागावर ह्या प्रणालीच्या प्रभावामुळे चांगला पाऊस पडेल. तसेच बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्ये आणि तेलंगाणा व कर्नाटकमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे खासगी हवामान संस्था स्कायमेटने दिलेल्या अंदाज म्हटले आहे.

मुंबईतील पाऊस कमी होणार नंतर वाढणार

गेल्या दोन ते तीन दिवसांत मुंबई शहरात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये ६ मि.मी. पावसाची नोंद झाली तर कोलाबा येथे 1 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. आता, पुढच्या २४ तासांत आज आणि उद्या मुंबईत पावसाळी क्रिया चालू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, चक्रीवादळ वायुच्या प्रभावाने वाहणारे दक्षिणपश्चिम वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. परिणामी, पावसाची तीव्रता कमी होईल, असे ‘स्कायमेट’ने नमूद केले आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या भागांत २३ जून ते २६ जून दरम्यान मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्या वेळी एक दोन ठिकाणी खूपच जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाजही स्कायमेटने वर्तविला आहे.

First Published on: June 17, 2019 5:06 PM
Exit mobile version