लोकसभा जागेच्या रस्सीखेचमध्ये कॉँग्रेसही सामील; नाशिक जिल्ह्यातील किमान एका जागेसाठी काँग्रेस आग्रही

लोकसभा जागेच्या रस्सीखेचमध्ये कॉँग्रेसही सामील; नाशिक जिल्ह्यातील किमान एका जागेसाठी काँग्रेस आग्रही

नाशिक : पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नाशिक , दिंडोरी लोकसभा मतदारसंघापैकी एक जागा काँग्रेसला सोडावी अशी आग्रही मागणी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली. सोमवारी नाशिक येथे जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही हा मुददा चर्चिला गेला. गेल्याच आठवडयात मुंबईत प्रदेश काँग्रेसकडून लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. यात नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आदींनी आढावा घेतला.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बहुतांश विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने हा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, सन २००९ पासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीला विजय मिळविता आलेला नसल्याचे यावेळी निर्दशनास आणून देण्यात आले. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याचा हट्ट पदाधिकार्‍यांनी यावेळी केला. धुळे लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत पक्षाने धुळे जिल्ह्याला संधी दिली मात्र आगामी लोकसभेसाठी मालेगावातूनच उमेदवार दिल्यास विजयी होणार असल्याचा दावा जिल्हा काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेलाही या मतदारसंघात उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सोमवारी जिल्हा प्रभारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही याविषयावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक वेळी मित्र पक्षाला जागा सोडण्यात येत असल्याने पक्ष केवळ आंदोलनापुरताच उरला आहे. अशावेळी कार्यकर्ते टिकवणेही अवघड होते त्यामुळे दोन पैकी एक जागा काँग्रेसला सोडण्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. नाशिक जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राजकीय परिस्थिती बदलल्याने जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघापैकी एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. ही जागा महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे डॉ.राजू वाघमारे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

 शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, अवकाळीच्या तडाख्याने शेतकरयांचे झालेले नुकसान तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुढील आठवड्यात चांदवड येथे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते तथा जिल्हा प्रभारी डॉ.राजू वाघमारे यांनी दिली. शेतकरी संवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर डॉ. वाघमारे व सहप्रभारी ब्रिज किशोर दत्त यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड आदी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बांदावर येऊन पाहणी केली. ते माघारी फिरताच पुन्हा गारपीट झाली. त्यात पुन्हा नुकसान झाल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.चांदवड येथे होणार्‍या शेतकरी संवाद मेळाव्याला प्रदेशाध्यक्षांसह माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. तर नाशिक शहरातील मध्यमवर्गीयांचेही अनेक प्रश्न आहेत. या संदर्भातही नाशिकमध्ये मेळावा घेण्यात येणार असल्याचे डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले.

First Published on: June 6, 2023 2:37 PM
Exit mobile version