अखेर निवडणूक टळली; काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतला

अखेर निवडणूक टळली; काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतला

विधानपरिषदेच्या निवडणुकीत ९ जागांवर काँग्रेस पक्षाने क्षमतेपेक्षा अधिक एक उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे विधानपरिषद निवडणूक घेण्याची वेळ येणार होती. मात्र आता महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, ” महाविकास आघाडीने 6 जागा लढाव्यात अशी आमची अपेक्षा होती. मात्र सध्या कोरोनाचे संकट असून, निवडणुकीसाठी आमदारांना मुंबईत यावे लागले असते. त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीत पाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.”

तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होती. त्यानुसार बैठकीत चर्चा झाली आणि निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. महाविकास आघाडीचे घटक म्हणून काँग्रेसने निर्णय घेतला.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन जागा लढविल्या होत्या. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीने एकच आमदारकी घेऊन काँग्रेसला दोन जागांची संधी द्यावी, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये होता. त्यामुळे काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर (पापा) मोदी यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीनेही दोन उमेदवारांची घोषणा केली. आघाडी धर्मामुळे राष्ट्रवादीने एकच उमेदवार घोषित करायला हवा होता, असेही काँग्रेसच्या वर्तुळात कुजबूज केली जात आहे.

महाविकास आघाडीचे सर्व पाच उमेदवार आता उद्या ११ मे रोजी आपले अर्ज भरणार आहेत. भाजपच्या चार उमेदवारांनी याआधीच आपले अर्ज सादर केले आहेत.

उमेदवारांची नावे – पक्षानुसार

शिवसेना – 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उपसभापती नीलम गोऱ्हे

राष्ट्रवादी – 

शशीकांत शिंदे
अमोल मिटकरी

काँग्रेस – 

राजेश राठोड किंवा पापा मोदी

भाजप – 

प्रविण दटके
गोपीचंद पडळकर
अजित गोपछडे
रणजितसिंह मोहिते पाटील

 

First Published on: May 10, 2020 7:14 PM
Exit mobile version