काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार

काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार

राहुल गांधींना समजून घेण्यात पवार कमी पडले! - बाळासाहेब थोरात

राज्यात ठाकरे सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू असतानाच या सगळ्याला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता जबाबदार असल्याची चर्चा महाविकास आघडीच्या नेत्यांमध्ये रंगल्याची बातमी आपलं महानगरने सगळ्यात आधी प्रसारित केली होती. मात्र, आता महाविकास आघाडीचे आणि विशेषत: काँग्रेसचे मंत्री मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर इतके नाराज आहेत की, मेहतांच्या तक्रारीचा पाढा वाचण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी भेटणार आहेत. विशेष म्हणजे या भेटीमध्ये काँग्रेस मंत्र्यांना महाविकास आघाडीमध्ये असलेले स्थान तसेच मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या बद्दलची काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये असलेली नाराजी हे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत. तसेच अजोय मेहता यांना लवकरच हटवावे, अशी मागणीदेखील करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या एका मंत्र्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. अजोय मेहता यांच्याबद्दल काँग्रेस मंत्र्यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक प्रस्ताव मंजूर करून घेणे तसेच मंत्र्यांचे फोन तसेच त्यांच्या मेसेजेसनाही उत्तर न देणे हे आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जसे अधिकार्‍यांवर विश्वास ठेवत आहेत. तसा विश्वास त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही दाखवावा, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, हीच खंत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलून दाखवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर फार विश्वास दिसत आहे. त्यांच्या विश्वासामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मंत्री असूनही संकटाच्या काळात राज्यात काहीच करू शकत नाही. याचमुळे संकटाच्या काळात जर आमचे मंत्रिपद कामाचे नसेल तर त्या मंत्रिपदाचा काय उपयोग? अशी भावना देखील काँग्रेसच्या मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी आपलं महानगरशी खासगीत बोलून दाखवली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणार्‍या बैठकीमध्ये मुख्य सचिव अजोय मेहता यांचा मुद्दा जरी अग्रक्रमावर असला तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत स्थान देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे. याचसाठी गुरुवारी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत देखील मुख्य सचिव अजोय मेहता हाच विषय अग्रक्रमावर होता असे देखील काँग्रेसच्या एका नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

First Published on: June 14, 2020 6:42 AM
Exit mobile version