प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत काँग्रेस नेत्यांची मुंबईत खलबतं

प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत काँग्रेस नेत्यांची मुंबईत खलबतं

बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी केल्यानं नव्या चेहऱ्यासाठी काँग्रेसच्या गोटात जोरदार खलबतं सुरु झाली आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. एच. के. पाटील यांनी मंगळवारी (५ जानेवारीला) रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्याशी काल रात्री बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे आज सकाळी बैठक होणार आहे. त्यानंतर काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांची मतं काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील जाणून घेणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी जोरदार हालचली सुरु झाल्या आहेत. काल रात्री काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी दिर्घ चर्चा झाली. दरम्यान, बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत असल्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होऊ शकते. प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तरुण नेत्याला संधी द्या, पाठीशी उभे राहू

मंत्रीपदासह आपल्यावर ३ महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपणच पक्षश्रेष्ठींशी बोलून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवल्याचं थोरात यांनी काल सांगितलं. तसंच तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असंही पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचं थोरात म्हणाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असेल हे आपण सांगू शकत नसल्याचंही थोरातांनी म्हटलं.

 

First Published on: January 6, 2021 9:33 AM
Exit mobile version