काँग्रेस आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा; उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

काँग्रेस आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा; उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी राजीनामा दिला.

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. निर्मला गावित यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गावित यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश करु, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे आज होणारे पक्षप्रवेश रद्द करून ते उद्या होणार असल्याची माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात आली. निर्मला गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्या दुपारी १२ वाजता मातोश्रीवर होईल. राजीनामा अध्यक्षांकडे सुपुर्त करत असताना निर्मला गावित यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र आणि इतर जिल्ह्यांमध्ये आलेला पूर ओसरल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा पूर येणार आहे. त्याची सुरुवात आज निर्मला गावित यांनी राजीनामा देऊन केली. नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून निर्मला गावित या २००९ आणि २०१४ अशा दोन वेळा आमदार म्हणून निवडून येत होत्या. मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

निर्मला गावित या काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. माणिकराव हे सलग ९ वेळा नंदुरबार मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत होते. २०१४ साली त्यांचा भाजपच्या हिना गावित यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र भरत गावित हे २०१९ साठी लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र काँग्रेसने के.सी. पाडवी यांना उमेदवारी दिल्याने भरत गावित देखील नाराज आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

First Published on: August 20, 2019 2:22 PM
Exit mobile version