उद्धव ठाकरेंनंतर राहुल गांधींचा आदित्य ठाकरेंना फोन; सरकारच्या कामावर कमेंट

उद्धव ठाकरेंनंतर राहुल गांधींचा आदित्य ठाकरेंना फोन; सरकारच्या कामावर कमेंट

खासदार राहुल गांधी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असल्यामुळे देशभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनीही हा मुद्दा टिकेसाठी वापरला. तर महाविकास आघाडीतील घटकपक्षच मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची बातमी पसरली. मात्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करत सरकार चांगले काम करत असल्याचे म्हटले होते. तर आता राहुल गांधी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना फोन करुन सरकारच्या कामावर कमेंट केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सदर वृत्त दिले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवटीवरुन रणकंदन माजले असतानाच राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली होती. काँग्रेस पक्ष राज्यात डिसिजन मेकर नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे चित्र राज्यासमोर गेले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन गैरसमज दूर केला होता, तसेच सरकारच्या प्रत्येक निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे कळवले होते. तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासंबंधी चर्चा केली होती.

आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करताना राहुल गांधी यांनी मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने स्क्रिनिंग आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढवायला हवे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे. दोन्ही उभय नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये कोणतेही वाद नसून या सरकारला कोणताही धोका नसल्याचेही बोलले जात आहे.

खासदार राहुल गांधी हे फेब्रुवारी महिन्यापासूनच केंद्र सरकारला कोरोनासंबंधी उपाययोजना राबविण्याबाबत सुचित करत होते. भारतात सर्वात आधी राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत जाहीर भाष्य करायला सुरुवात केली होती. आताही ते केंद्र सरकारवर कोणतीही राजकीय टीका करत नसून कोरोनासंबंधी आपण एकत्र येऊन काम करावे लागेल, असे सांगत आहेत.

First Published on: May 28, 2020 12:59 PM
Exit mobile version