राष्ट्रवादीच्या विरोधात नाना पटोलेंची सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार

राष्ट्रवादीच्या विरोधात नाना पटोलेंची सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील वाढलेला वाद अद्यापही कमी होण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करून महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली. मात्र, तीन कुटुंबे एकत्र असल्यावर भांड्याला भांडे लागणारच, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रकरण फार गंभीर नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवालही त्यांनी केला होता.

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. ३० जानेवारी २०२२ रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.मात्र असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपसोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली, असे पटोले म्हणाले होते.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावे हा त्यांचा अधिकार आहे. त्याला फार महत्त्व देण्याचे काही कारण नाही,कारण आम्ही देखील आमच्या पक्षात काही झाले तर शरद पवारांना, मुख्यमंत्र्यांना सांगतो. ही परंपरा आहे. हे चालत असते. आघाडी सरकार असल्याने भांड्याला भांडं लागणारच, अशावेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी भांड्याला भांडं लागू नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे, लक्ष देऊन नीटपणे सरकार चालवले पाहिजे.


हेही वाचा – गुरूपीठ ५० कोटींचा अपहार प्रकरण; अण्णासाहेब मोरेंच्या समर्थनार्थ सेवेकऱ्यांचा मोर्चा

First Published on: May 16, 2022 10:04 PM
Exit mobile version