७ जून अर्थात ‘पाऊस – पाडवा’

७ जून अर्थात ‘पाऊस – पाडवा’

शहरात पावसाची उघडीप.

‘पाऊस पाडवा’ हा शब्द बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेशिवाय कधीच ऐकिवात नाही. खरंतर बऱ्याच जणांना म्हणजे नक्की काय? असाही प्रश्न पडेल. ७ जून आणि मृग नक्षत्राचा पाऊस हे समीकरण सगळ्यांनाच माहीत आहे. पण नक्की ‘पाऊस पाडवा’ म्हणजे काय? आणि त्याचा आज काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर त्याचं उत्तर नक्कीच मिळेल.

पाऊस – पाडवा म्हणजे नक्की काय?
पावसाने आरंभ होणाऱ्या वर्षाचा पहिला दिवस, या अर्थाने ‘पाऊस-पाडवा’ हा शब्द मढेर्करांनी वापरला असेल का? तसे असेल तर, कोणते हे वर्ष? कोणता हा दिवस? पाडवा अर्थात वर्षाचा पहिला दिवस. तर साधारणतः मृग नक्षत्र हे ७ अथवा ८ जूनला येतं आणि या दिवशी पाऊस पडल्यास संपूर्ण हंगामात चांगला पाऊस पडणार अशी धारणा आहे. आज ७ जून आहे आणि पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

नक्षत्रांच्या पावसावरून म्हणीही रूढ
मृगाचा पाऊस, आर्दाचा पाऊस, हस्ताचा पाऊस, असा नक्षत्रांचा निर्देश हा पाऊस करतो. प्रत्येक पावसाची जात वेगळी, पोत वेगळा आणि कार्यही वेगळे असतं. म्हणूनच ‘मृगाचे आधी पेरावे आणि बोंबेच्या आधी पळावे’, ‘पडेल हस्त तर पिकेल मस्त’, ‘पडतील चित्रा, तर भात खाईल कुत्रा’, ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ अशा म्हणी रूढ झाल्या. आजही सर्वच जण ७ जूनला पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. जेणेकरून हा संपूर्ण हंगाम व्यवस्थित निघून जाईल आणि सर्वांना चांगला पाऊस मिळून पाण्याच्या समस्या दूर होतील.

७ जून म्हणजे निसर्गाचा पारंपरिक सोहळा
मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा निसर्गात सजवणारी ही तारीख. काळ पुढे सरकला. गावांचे उंबरे शहरांकडे सरकले. शहरांची धाव महानगरांकडे गेली. सगळे वेगानं बदलत गेलं. पण पाऊस मात्र तसाच राहीला आणि याच पावसाचं सेलिब्रेशन म्हणजे सात जून. यावेळी पाऊस काय कमाल दाखवणार हे येणारे महिनेच ठरवतील. पण सध्या तरी नियमाप्रमाणे ७ जूनला त्यानं दमदार हजेरी लावली आहे.

First Published on: June 7, 2018 2:03 AM
Exit mobile version