भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी जाधव निलंबित

भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी जाधव निलंबित

छगन भुजबळ

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ त्यांचा काहीही संबंध नसताना श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भुजबळ यांना उद्देशून शिवीगाळ केल्याचे प्रकरण बुधवारी विधानसभेत गाजले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंगाद्वारे जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली. याला राज्यातील सर्व पक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांना निलंबित करण्याचा आदेश दिला.

सरकारी अधिकारी 353 कलमाचा गैरफायदा घेतात. या कलमाचा आधार घेत ते आमदारांनाही जुमानत नाहीत. आमच्यावर नको ते आरोप ठेवतात. पोलीस अधिकारी तर या कलमाचा अतिरेकी वापर करू लागले आहेत. यामुळेच आमदारांविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत, असा आक्षेप घेत विधानसभेत सर्वच पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. अधिकार्‍यांवर कोणाचाच धाक राहिलेला नाही. सरकार या अधिकार्‍यांनाच पाठिशी घालत आहे, यामुळेच अधिकारी मस्तवाल झाले आहेत, असा घरचा अहेर सत्ताधारी आमदारांनी सरकारला दिला.

आमदारांनी केलेल्या या हल्ल्याने सरकारची चांगलीच दमछाक झाली. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपच्या आमदारांचा यात पुढाकार होता. सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अध्यक्षांनी तीन वेळा सभागृह तहकूब केले. त्यानंतर अध्यक्ष बागडे यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना तातडीने निलंबित करण्याचे निर्देष दले.

पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली आहे. विधानसभा सदस्याचा अवमान पोलीस अधिकार्‍यांकडून सर्रार होत आहे. जाधव यांना निलंबित करावे.
– छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

पोलीस अधिकारी मुजोर झाले आहेत, खोटेनाटे गुन्हे दाखल करून आमदारांचा छळ करतात. पोलिसांच्या याच मुजोरी वृत्तीमुळे मी माझे वडील गमावून बसलो आहे.
– आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

353 कलमातील सुधारणांचा अधिकार्‍यांनी अतिरेकी वापर सुरू केला आहे. आम्ही आमच्या बायका मुलांसाठी काही मागायला अधिकार्‍यांकडे जात नाही. सरकारने हे कलम लोकप्रतिनिधींना अडकवण्यासाठी केले आहेे काय? अ‍ॅट्रॉसिटीपेक्षा जलद अटक या कलमाचा आधार घेऊन केली जात आहे.
– आमदार बच्चू कडू

राज्यात सत्ता कोण चालवत आहे? सरकारचा धाक नसल्याने अधिकारी शिरजोर झाले आहेत. सचिव तर मुख्यमंत्र्यांहून स्वत:ला श्रेेष्ठ समजू लागले आहेत. सरकारला आणि लोकप्रतिनिधींनाही ते जुमानत नाहीत. ज्यांनी आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवले त्या अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करा.
– राधाकृष्ण विखेपाटील, विरोधी पक्षनेते

मला कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. त्या आरोपीने मला भुजबळ यांच्या विरोधात बोलण्यासाठी भडकावून दिले होते, तसेच जी ऑडिओ क्लिप वायरल झाली ती अपुरी आहे ती पूर्ण का नाही याची सत्यताही तपासून पाहण्याची गरज आहे.
– महावीर जाधव , निलंबित पोलीस उपनिरीक्षक

First Published on: July 19, 2018 6:38 AM
Exit mobile version