कोरोना अलर्ट! देशभरात १०-११ एप्रिल रोजी मॉक ड्रिल

कोरोना अलर्ट! देशभरात १०-११ एप्रिल रोजी मॉक ड्रिल

देशभरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६,०५० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह केसेसचा आकडा २८,३०३ पर्यंत पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मांडविया यांनी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांना १० आणि ११ एप्रिल रोजी सर्व रुग्णालयांचा दौरा करून मॉक ड्रिल घेण्याच्या तसेच कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.

सध्या देशात ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट वेगाने पसरत आहे. या सबव्हेरियंटची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची गरज आहे, असेही मांडविया यांनी नमूद केले.

या बैठकीनंतर माहिती देताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, केंद्राकडून सातत्याने देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. सर्वच राज्यांना आपत्कालीन स्थिती आणि कोरोना हॉटस्पॉटची माहिती घेण्यास सांगितले आहे. त्यासोबतच टेस्टिंग, जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याची माहिती घेऊन त्या अधिक सक्षम करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाशी संबंधित नियमांचे सक्तीने पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

टॉप ५ राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर
देशात गेल्या २४ तासांत आढळलेल्या ६,०५० नवीन कोरोना रुग्णांपैकी ४०३७ रुग्ण केवळ ५ राज्यांतील आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये आहेत. येथे १९३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात ८०३ कोरोना रुग्ण आहेत. दिल्लीत ६०६, हिमाचल प्रदेश ३६७ आणि गुजरातमध्ये ३२७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

सरकारने गांभीर्याने घ्यावे
वाढत्या कोरोनामुळे अनेक जण मृत्यूच्या जाळ्यात सापडत असल्याचा बातम्या समोर येत आहेत. माझी सरकारला विनंती आहे की, ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. पत्रकार परिषद घेऊन काही माहिती दिल्यास लोकांना वस्तुस्थिती माहिती होईल आणि काय खबरदारी व काळजी घ्यायला पाहिजे हे समजेल.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

First Published on: April 8, 2023 4:37 AM
Exit mobile version