महावितरणातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

महावितरणातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

महावितरणाचा ग्राहकांना पुन्हा झटका! उद्यापासून सुरु होणार बिलांची वसुली

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणाचे अनेक कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व आर्थिक सहायता देण्यासह विविध निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतले आहेत. यामध्ये कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांना उपचाराच्या तसेच विलगीकरणाच्या कालावधीची भर पगारी रजा मंजूर करण्यात आली असून वेतनश्रेणी तीन व चारच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी विशेष बाब म्हणून एकवेळ एक हजार रुपये देण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये वीजसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिमंडलस्तरावर समन्वय कक्ष सुरु करण्यासोबतच वैद्यकीय मदतीसह आर्थिक सहायता करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी निर्णय घेत सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना काळात वैद्यकीय व आर्थिक सुरक्षा कवच देणारे परिपत्रक जारी केले आहे.

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. वेतनश्रेणी तीन व चारमधील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी एकवेळा एक हजार रुपये विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रीम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य तसेच विम्याचे २० लाख असे एकूण ५० लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या सर्व नियमित (प्रशिक्षणार्थी व सहायक यांच्यासह) व बाह्यस्त्रोत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या वारसांचा समावेश आहे.

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची मान्यता मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून व स्वतः संपर्क साधत आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत २७ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यातही त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. सोबतच सर्व वीज कर्मचाऱ्यांचे जलदगतीने लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरु असून आतापर्यंत ५७ टक्के वीज कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न युध्दस्तरावर सुरू आहेत. वीज कर्मचाऱ्यांचे काम आरोग्य व पोलीस विभागांप्रमाणेच अत्यावश्यक असल्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे तसेच परिमंडल समन्वय कक्षाचा दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले असून कोरोना बाधितांची ते आस्थेने विचारणा करीत आहेत.

महावितरणच्या मुख्यालयासह सर्व परिमंडल कार्यालयांमध्ये चार सदस्यीय कोरोना समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून या कक्षांद्वारे कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांना व कुटुबियांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महावितरणच्या विविध वसाहतींमधील निवासस्थानांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी रिकामे असलेली निवासस्थानांची डागडुजी सुरु करण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त सोय म्हणून प्रशिक्षण केंद्रे तसेच तेथील निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे सहकार्य केले जात आहे.


First Published on: May 25, 2021 5:15 PM
Exit mobile version