Coronavirus : कोरोना बाधित रुग्णांची खासदारांकडून पाहणी!

Coronavirus : कोरोना बाधित रुग्णांची खासदारांकडून पाहणी!
शासकीय महिला प्रसूतीगृहाचे रूपांतर कोविड-१९ रुग्णालयात करण्यात आले आहे. या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उल्हासनगरातील कडकडीत लॉकडाऊनने कमालीचे प्रभावित झाले असून इतर शहरांनी याचे अनुकरण करावे, असे स्पष्ट करताना शिंदे यांनी पालिका-पोलीस-डॉक्टर्स यांचे कौतूक केले. काल सायंकाळच्या सुमारास डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शासकीय महिला प्रसूतिगृहात सज्ज करण्यात आलेल्या कोविड-१९ या रुग्णालयाची पाहणी केली. ५० खाटा आणि ५ व्हेंटिलेटर असलेल्या या रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याची संपूर्ण यंत्रणा पूर्ण झालेली आहे. ते बघून शिंदे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासोबत डॉक्टरांच्या टीमला शाबासकी दिली आहे. अवघ्या १३ किलोमीटर चौरस क्षेत्रफळात वसलेल्या उल्हासनगरात याघडीला एकही कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्ण नसल्याने डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सोबत डॉक्टरांच्या टीमचे कौतूक केले आहे.
शहरातील प्रमुख रोडवर केवळ मेडिकल स्टोर्स, मोजक्या किराणा दुकानां व्यतिरिक्त सायंकाळी ५ वाजल्यानंतर मटण, चिकन, भाजीपाला, फळ विक्रेते असे सर्वत्र कडकडीत बंद आणि जागोजागी असणाऱ्या पोलिसांच्या कडक पहाऱ्याने किंबहूना सक्रिय यंत्रणेमुळे संपूर्ण सन्नाटा हे खरे लॉकडाऊन असून या शहराचे अनुकरण इतर शहरांनी करावे असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, अधिक्षक डॉ.भावना तेलंग, पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी, डॉ. सुहास मोहनाळकर उपस्थित होते.
दरम्यान सायंकाळी ५ वाजल्यापासून भाजीपाला, मटण, चिकन, फळांची दुकाने आणि रात्री १० नंतर किराणा, दुधडेरी बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तीन दिवसांपूर्वीच काढले होते. त्याचे पालन काटेकोरपणे होत असून १० च्या नंतर सुनसान असे चित्र दिसत आहे. पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे, दिलीप उगले (वाहतूक शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सुधाकर सुरडकर, रमेश भामे, संजय सावंत, श्रीकांत धरणे (वाहतूक शाखा) यांची टीम डे-नाईट ऑन रोड असल्याने उल्हासनगरातील लॉकडाऊन चर्चेचा विषय बनला आहे. यासोबत कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या सिमा लॉक करण्यात आल्या आहेत.
First Published on: April 7, 2020 3:20 PM
Exit mobile version