करोनासोबत जगायला शिका

करोनासोबत जगायला शिका

आपण करोना विषाणूंसोबत जगायला शिकले पाहिजे, असे महत्त्वपूर्ण विधान केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांनी केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अग्रवाल यांच्या हे वक्तव्य म्हणजे निदान केंद्र सरकार तरी लॉकडाऊन वाढवण्याच्या मन:स्थितीत दिसत नसल्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर मुंबईतील वाढती करोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता केंद्र सरकारची एक टीम दर आठवड्याला मुंबईत पाठवण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

देशभरात करोना बाधितांचा आकडा 56 हजारांच्या पुढे गेला असून आतापर्यंत 1886 लोकांचा यात बळी गेला आहे. मागच्या 24 तासांमध्ये तब्बल 3390 नवीन लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

संपूर्ण भारतात तिसर्‍या टाळेबंदीच्या टप्प्यात लोकांचा जीव फारसा रमताना दिसत नाही, प्रत्येकजण कंटाळलाय, लॉकडाउनच्या नावाने बोटं मोडतोय, संयम किती दिवस बाळगायचा अशा चर्चा सध्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर रंगतायत. काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी एक वेबीनारला संबोधित करताना सांगितले की, भारताला करोना विषाणूंसोबत जगायला शिकावे लागेल. कारण अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते करोना हा काही दिवसात संपुष्टात येणार विषय नाही, हळूहळू याचे प्रमाण कमी होईल.

राज्यात १०८९ नवे रुग्ण, ३७ मृत्यू

राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सलग तीन दिवसांपासून राज्यात हजारपेक्षा अधिक करोना रुग्ण सापडत आहेत. ही बाब राज्यासाठी चिंतेची ठरत आहे.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना गेल्या तीन दिवसांपासून राज्यात करोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. राज्यात करोनाबाधितांच्या रुग्णांनी सलग तीन दिवस एक हजारांचा आकडा पार केला. राज्यात शुक्रवारी तब्बल १०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ७४८ रुग्ण सापडले. शुक्रवारी राज्यात सापडलेल्या रुग्णांमुळे करोनाबाधितांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. राज्यात ३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये मुंबईमधील २५, पुण्यातील १० , जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १९ पुरुष तर १८ महिला आहेत. तसेच ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७३१ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,१२,३५० नमुन्यांपैकी १,९२,१९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १९,०६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३,५५२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५२.६४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

सध्या राज्यात २,३९,५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. शुक्रवारी १६९ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आतापर्यंत ३४७० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

First Published on: May 9, 2020 7:14 AM
Exit mobile version