भाजपशासित राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या लपवली!

भाजपशासित राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या लपवली!

भाजपशासित राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दडवली जात असून गुजरातमध्ये तर चाचण्याच केल्या जात नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी केला. उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये हे अंधारकोठडीपेक्षा भयानक असून गुजरातची तुलना बुडत्या टायटॅनिक जहाजाशी केली आहे. गुजरातमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीत. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशमध्ये तीच परिस्थिती आहे. भाजपशासित राज्यात तेथील सरकारांनी कोरोनासमोर लोटांगण घातले असून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गुजरात मॉडेलच्या चंद्राला पडलेली विवरे आधी पहावीत आणि नंतर महाराष्ट्र सरकारबद्दल बोलावे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

गुजरात उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या तक्रारीची दखल घेत कोरोनावर सुनावणी घेऊन गुजरातमधील आरोग्य यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर आणला आहे. ज्या पद्धतीची विधाने उच्च न्यायालयाने दिली त्यातून भाजप सरकारचा अकार्यक्षमपणा उघड झाला आहे.  अहमदाबादमधील कोरोना परिस्थितीवर सरकारच्यावतीने उत्तर देताना महाधिवक्त्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक असून कोरोनाच्या चाचण्याच करत नसल्याचे सांगून चाचण्या केल्या तर एकट्या अहमदाबादमध्ये ७० टक्के कोरोना रुग्ण आढळतील असे म्हटले आहे. याचा अर्थ अहमदाबादची सध्याची ७८ लाख लोकसंख्या गृहित धरता ७० टक्के रुग्ण म्हणजे कमाल ५५ लाख तर किमान ४० लाख कोरोना रुग्ण आहेत असे म्हणावे लागेल, असे सावंत म्हणाले.

भाजपशासित राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती असून उत्तर प्रदेश, कर्नाटकची परिस्थितीही याहून वेगळी नाही. ही परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील परिस्थितीवर बोलण्याचा राज्यातील भाजप नेत्यांना नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्रात वैज्ञानिक पद्धतीने सरकार काम करत असून टाळ्या वाजवणे, दिवे लावणे अशी कामे करत नाही, असेही सावंत यांनी भाजपला नाव न घेता सुनावले.

सध्याचे कोरोनाचे आव्हान मोठे आहे.‌ काही त्रुटी असतील तर विरोधकांनी त्या दाखवून द्याव्यात आणि सरकारला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोरोना सगळ्यांचा शत्रू आहे. परंतु भाजपचे राज्यातील नेते मात्र सरकारलाच शत्रू समजत आहेत. भाजपचे केंद्रातील नेते सत्तापिपासू तर आहेत पण राज्यातील नेतेही सत्तेसाठी वेडेपिसे झालेत त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही,अशी टीकाही सचिन सावंत यांनी केली.

First Published on: May 26, 2020 6:55 PM
Exit mobile version