नांदेडमध्ये कोरोनाचा विस्फोट, कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी लागल्या लांबच लांब रांगा

नांदेडमध्ये कोरोनाचा विस्फोट, कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी लागल्या लांबच लांब रांगा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेडमध्ये कोरनाचा उद्रेक झाल्याचे दिसते आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार पुढे गेली आहे. तसेच एका दिवसात ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला असल्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांग लागली आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना १२ तास लाईनमध्ये राहावं लागत आहे. नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे नांदेडकर आणि जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नांदेडसह इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. परंतु कोरोनाची पुन्हा लाट आल्याने प्रादुर्भाव वाढला आहे. नांदेडमध्ये कोरोनाने हैदोस घातला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. नांदेड शहरातील मृतांची संख्या वाढल्यामुळे शहरात असलेल्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी रांग लागली होती. यामध्ये काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी १२ तास वाट पाहावी लागली आहे.

नांदेडमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रशासनाकडून नांदेडमधील जनतेला विनाकारण बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. नांदेड शहरात स्मशानभूमीतील दहन करण्यासाठी असलेल्या स्टँडची संख्या कमी असल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे या स्मशानभूमीच्या आवारात लाकडे रचून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असल्यामुळे नांदेड प्रशासनावर ताण आला आहे.

First Published on: March 26, 2021 6:20 PM
Exit mobile version