Coronavirus: पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन डॉ. चंदनवालेंची तडकाफडकी बदली

Coronavirus: पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन डॉ. चंदनवालेंची तडकाफडकी बदली

डॉ. अजय चंदनवाले

पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांची बुधवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर रोखण्यात अपयश आल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या उपाययोजनेचे अधिकार कार्यभार आता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे देण्यात आले आहेत. तर उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे रुग्णालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. ससूनमध्ये मागच्या १५ दिवसांत ३८ कोरोनाबाधि रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूनच्या वाढत्या संसर्गामुळे ससून रुग्णालयातील नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. ससून रुग्णालयात दररोज किमान एक तरी मृत्यू होत आहे. त्यामुळे मृत्यूंचा आकडा झपाट्याने वाढला. अशातच राज्याच्या आरोग्य विभागाने डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली आहे. चंदनवाले यांच्या बदलीमागे त्यांची कार्यशैली कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

डॉ. चंदनवाले यांच्याकडे आता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सह संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी होती, आता त्यांना ही जबाबदारी पुर्णवेळ देण्यात आली आहे. गुरुवारी हे आदेश काढल्यानंतर या आदेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

यावर डॉ. चंदनवाले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सरकारच्या आदेशाचे पालन केले जाईल. शुक्रवारी डॉ. तांबे यांच्याकडे पदभार सोपवून मी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाचा पदभार घेईल.”

First Published on: April 17, 2020 9:49 AM
Exit mobile version