कोरोनावरून राज्यात पाटील विरूद्ध पाटील सामना!

कोरोनावरून राज्यात पाटील विरूद्ध पाटील सामना!

‘दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागले तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला’, अशी खोचक टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या ठरावावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. ‘भाजपाचे कार्यकर्ते विविध माध्यमांतून लोकांना मदत करत असताना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते कुठे आहेत?,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. अखेर त्या टिकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

काय म्हणालेत नेमकं जयंत पाटील?

‘चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या करोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते,’ असं जयंत पाटील म्हणाले. तसेच ‘भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील, तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास राष्ट्रवादीचे फेसबुक आणि ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल. चंद्रकांत दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागलं तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला,’ असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला.

आधी काय म्हणाले होते चंद्रकांत दादा?

‘जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, त्याची गरज सगळ्यात जास्त आहे’, असा टोला महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला होता.

First Published on: April 12, 2020 9:11 PM
Exit mobile version