Coronavirus : कस्तुरबा रुग्णालयाने नाकारलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह!

Coronavirus : कस्तुरबा रुग्णालयाने नाकारलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस लिक, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

सर्दी – ताप, उलट्या यामुळे कस्तुरबामध्ये दाखल झालेल्या एका रुग्णाला तुम्हाला कोरोनाची लागण झालेली नसून केवळ ताप आहे, त्यामुळे तुम्ही इतर रुग्णालयात दाखल व्हा, असे कस्तुरबाच्या डॉक्टरांनी लेखी लिहून दिले. मात्र, इतर रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने नातेवाईकांनी त्या रुग्णाला कस्तुरबाच्या तापाच्या वॉर्डमध्येच उपचारासाठी दाखल केले आणि नंतर त्याची पुन्हा चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दक्षिण मुंबईतील लालबाग येथील एका रुग्णाला गेल्या तीन दिवसांपासून सर्दी, ताप खोकला आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास त्याला कस्तुरबा रुग्णालयात नेले. या रुग्णाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला कस्तुरबामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना नसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर त्याला कोरोनाची चाचणी करण्याची गरज नसल्याचे लेखी लिहून दिले. एवढेच नाही तर तापासाठी इतर रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही त्याच्या नातेवाईकांना देण्यात आला.

त्याच्या नातेवाईकांनी बाहेर चौकशी केली असता त्यांना इतर रुग्णालयाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा कस्तुरबाला विनंती केली. त्यामुळे संबंधित रुग्णाला तापाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा पुन्हा त्याला त्रास होऊ लागल्यानंतर त्याची कोरोनासंदर्भातील चाचणी करण्यात आली. या चाचणीचे शनिवारी सकाळी अहवाल आले, असून हा रुग्ण त्यात पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्दी, पडसे, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड-१९ चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत, अशी सूचना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केली आहे. मात्र, प्रत्यक्षात लक्षणे असतानाही रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात येत नसल्याच्या या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित रुग्णांसंदर्भात मला माहिती नाही. परंतु करोनाच्या लक्षणासंदर्भात मार्गदर्शक धोरण बनवण्यात आले आहे. त्यामधील धोरणांनुसार डॉक्टर चाचणी करण्याचा निर्णय घेतात, असे स्पष्ट केले. बऱ्याच वेळा सुरुवातीच्या स्टेजला करोनाची लक्षणे दिसत नाही आणि चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह येतात. त्यानंतर दोन चार दिवसांनी त्याच रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचीही उदाहरणे आहेत. रुग्णाला पाहिल्यानंतर डॉक्टरांना जे दिसले असेल,  त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असेल. यासर्व तांत्रिक बाबी असून करोनाची लक्षणे असूनही चाचणी केली जात नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जी लक्षणे दिसून आली किंवा तपासल्यानंतर डॉक्टरांना चाचणी न करण्याचे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु डॉक्टर हे योग्य प्रकारे आपले कर्तव्य पार पडत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: April 5, 2020 5:19 PM
Exit mobile version