कोरोना चाचणीच्या अहवालांना विलंब, संशयित कोरोनाच्या चिंतेने बेहाल

कोरोना चाचणीच्या अहवालांना विलंब, संशयित कोरोनाच्या चिंतेने बेहाल

राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, ठाण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण कोरोना चाचणी करत आहेत. परंतु कोरोना चाचणीच्या अहवालाला विलंब होत असल्याने कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण घाबरुन जात आहेत. कोरोना चाचणीचे अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्ण उपचार करुन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवलीमध्ये कोरोना चाचणीचे अहवाल दोन ते तीन दिवस प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोरोना अहवाल मिळण्यास वेळ लागत असल्यामुळे संशयित रुग्णांना स्कॅनिंगच्या अहवालावर दाखल करुन घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासगी डॉक्टर कडून करण्यात येत आहे. कल्याण, डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या सहवासात आलेल्या आणि परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी सर्व केंद्रांवर मोठ्या रांगा लागत आहेत.

कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसाला ५ ते ६ हजार संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब घेतला जात आहे. यामधील रोज २ ते ३ हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित राहत आहेत. कोरोना चाचणीच्या अहवालाला विलंब होत असल्यामुळे स्वॅब दिलेल्या नागरिकांना आपण कोरोनाबाधित आहोत की नाही याची चिंता सतावत आहे. तसेच कोरोना चाचणीच्या अहवालांना वेळ लागत असल्यामुळे मोठ्या रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये दररोज २ ते ३ हजार कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याने येथील कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे.

First Published on: April 12, 2021 4:05 PM
Exit mobile version