अमरावतीत तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

अमरावतीत तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

अमरावतीमध्ये कोरोना टेस्टिंगच्या नावाखाली एका तरुणीसोबत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब नमुने घेण्यात आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त जमावाने कोरोना टेस्टिंग लॅबची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच आरोपी लॅब टेक्निशियनला जास्तीतजास्त शिक्षा करण्याची मागणीही केली आहे. याप्रकरणी आरोपी अल्पेश अशोक देशमुख (30, रा. पुसदा, जि. अमरावती) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, अमरावतीतील बडनेरात अत्यंत धक्कादायक घडली, कोरोनाच्या टेस्टिंगसाठी महिलेच्या गुप्तांगामधून स्वॅब घेण्यात आला, हे करण्याची हिंमत टेक्निशियनची झाली कशी? तो मुलीला कसं घेऊन गेला? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. सरकारने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, स्वॅब टेस्टिंग फक्त नाकाद्वारे केली जाते, आज या मुलीने हिंमत केली म्हणून हा प्रकार समोर आला. राज्यात कोरोनाच्या नावाखाली ग्रामीण भागातील महिलांना काय काय प्रकार सहन करावा लागला असेल? अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. महिलांच्या जगण्याचा सन्मान हिरावला जात आहे, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत, बाहेर नाहीत आणि आता या स्वॅब टेस्टिंगच्या नावाखाली कुठे काय घडले असेल हे सांगता येत नाही. महिला सुरक्षेबाबत सरकारचे लक्ष नाही. अत्यंत वाईट आणि निंदनीय घटना महिलांसोबत घडत आहेत. त्यामुळे महिलांबाबत बोलणारे नेते आता कुठे गेलेत? दिशा कायद्याचे काय झाले? महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे, असा टोलाही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणात पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. महिला सक्षम झाल्याने मी खासदार झाले, प्रतिभाताई देशाच्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या, याच जिल्ह्यातील महिला आमदार पालकमंत्री आहेत तरीही असे धक्कादायक प्रकार होत आहेत. कोविड रुग्णांचे हाल सुरू आहेत. आरोग्य यंत्रणा संपूर्ण ढासळली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

First Published on: July 31, 2020 6:54 AM
Exit mobile version