कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्याची झोळी रिकामीच

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्याची झोळी रिकामीच

गतवर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये विविध कॉर्पोरेट कंपन्या, व्यक्ती, सामाजिक संस्थांनी तब्बल 115 कोटींपेक्षा जास्त किमतीचे वैद्यकीय साहित्य दिले होते. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यात राज्याला मोठी वैद्यकीय मदत मिळाली. मात्र, दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने राज्यामध्ये थैमान घातले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर असल्याने राज्य सरकारने मदतीसाठीचे पत्र पाठवूनही अद्यापपर्यंत एकही कॉर्पोरेट कंपनी, सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आली नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्याची झोळी रिकामीच राहिली आहे.

गतवर्षी राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होताच राज्य सरकारने कंपन्या आणि दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील अनेक कंपन्या, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, चित्रपटसृष्टीतील कलाकार, उद्योजक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्य सरकारला मदतीचा हातही पुढे केला. विविध कंपन्या, संस्था, व्यक्ती आणि आस्थापना यांच्याकडून येणारी मदत हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाकडे जमा करण्यात येत होती. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये पीपीई किट, प्रोटेक्टिव्ह क्लोथ, एन 95 मास्क, ग्लोव्हज, व्हेटिलेटर, थ्री, प्लाय मास्क, फेस शिल्ड, हॅण्ड सॅनिटायझर, थर्मामीटर, सर्जिकल कॅप्स, ऑक्सिमीटर, बेडशीट, बेड असे वैद्यकीय साहित्य व उपकरणे मोठ्या प्रमाणात दान करण्यात आली. यामध्ये एल अँड टी इंडस्ट्रीज लिमिटेड, हिकल लिमिटेड, अमेरिकेअर फाऊंडेशन, हुंदाई मोटर्स, सिमेन्स लिमिटेड, रिलायन्स जिओ, टेक महिंद्रा, गोदरेज इंडस्ट्रीज, रोटरी क्लब, डेटॉल, एचडीएफसी लिमिटेड या कंपन्यांनी सीएसआर निधीतून तर मेथीबाई देवराज गुंडेचा फाऊंडेशन, पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, अमेरिकेअर इंडिया फाऊंडेशन आणि रिलायन्स जिओने आवश्यक साधने व उपकरणे राज्य सरकारला दिली. दान करण्यात येणारे वैद्यकीय साहित्य व उपकरणे हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाकडून तातडीने जिल्ह्यांना वितरित करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यास राज्य सरकारला बळ मिळाले.

गतवर्षी सप्टेंबरपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कंपन्या व संस्थांनी हाफकिनकडे देण्यात येणारी मदत थांबवली होती. 4 सप्टेंबरला अखेरची मदत देण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली. मार्च, एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांनी राज्यात उच्चांक गाठला. राज्यामध्ये व्हेंटिलेटर, बेड, यासारख्या महत्वाच्या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला होता.

पहिल्या लाटेच्या तुलनेत प्रचंड असलेल्या दुसर्‍या लाटेमध्ये कोरोनाचे रुग्ण व रुग्णांच्या मृत्यूने नवनवे उच्चांक प्रस्थापित करत राज्य सरकारला जेरीस आणले आहे. या बिकट परिस्थितीमध्ये राज्य सरकारतर्फे हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडने राज्यातील कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या सीएसआर निधीतून मदत करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. मात्र, अद्याप एकाही कंपनी, सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे केला नाही. कंपन्या व संस्थांनी हात आखडता घेतल्याने दुसर्‍या लाटेमध्ये राज्याची झोळी रिकामी राहिली असल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी कंपन्या व सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. सध्या तरी कोणतीही मदत आली नाही. आम्ही कॉर्पोरेट कंपन्यांना सीएसआर निधीअंतर्गत मदत करण्यासाठी पत्र लिहिलेले आहे. त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. दुसरी लाट इतकी मोठी असेल अशी अपेक्षा कंपन्यांनी बहुतेक केली नसेल; पण येत्या काळात त्यांच्याकडून मदत येण्याची शक्यता आहे.
– सुभाष शंकरवार, उत्पादन महाव्यवस्थापक, हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड

गतवर्षी करण्यात आलेली मदत
एन 95 मास्क – 4,75,489
थ्री प्लाय मास्क – 33,30,740
पीपीई किट – 1,91,908
हॅण्ड ग्लोव्हज – 1,52,100
हॅण्ड सॅनिटायझर – 4,61,238
डेटॉल सोप – 10,28,100
फेस शिल्ड – 76,250
व्हेंटिलेटर – 191
अस्थमा इन्हेलर – 10,000
इन्फ्रारेड थर्मोमीटर – 252
कोविड टेस्टिंग किट – 280
सर्जिकल कॅप्स – 2250

First Published on: April 29, 2021 4:15 AM
Exit mobile version