Corona Update : लॉकडाऊन हा पर्याय नाही, पण निर्बंध अधिक कठोर करणार! 

Corona Update : लॉकडाऊन हा पर्याय नाही, पण निर्बंध अधिक कठोर करणार! 

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा नकार, तर लोकलबाबत विचार सुरु असल्याची टोपेंची माहिती

मुंबईसह महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आता अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. कोरोना संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे टोपे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी राज्यातील जनतेला कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

राज्यात कोरोनाबाधित एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना यावेळी टोपे यांनी केली.

महाराष्ट्रात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी आणि शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.

First Published on: March 15, 2021 7:58 PM
Exit mobile version