तिसर्‍या लाटेत मुलांना संसर्ग झाल्यास आई-वडील काय करतील?

तिसर्‍या लाटेत मुलांना संसर्ग झाल्यास आई-वडील काय करतील?

देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यात लहान मुलांनाही संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या मुलांचे आई-वडील काय करतील? या मुलांसोबत कोरोना केंद्र, हॉस्पिटलमध्ये ते असतील काय? त्याबाबत सरकारने काय नियोजन केले आहे, असे सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केले आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त करत लहान मुलांचेही लसीकरण करण्याचा विचार करावा, असे केंद्र सरकारला सुचित केले.

कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. अशा परिस्थितीत दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये. सरकारने देशभरात ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष दिले पाहिजे. ऑक्सिजनचे ऑडिट करून त्याच्या वितरणाबाबत पुन्हा एकदा विचार केला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने केंद्राला सांगितले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांनाही संसर्गाचा धोका आहे. शास्त्रज्ञांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. यामुळे लसीकरण मोहिमेत मुलांचाही विचार करावा, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. घरीच उपचार घेणार्‍या नागरिकांना ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजनची आवश्यकता किती याचे आकलन करण्याची पद्धत चुकीची आहे. कारण आपल्याला संपूर्ण देशाचा विचार करायचा आहे. आपण आतापासूनच तयारी केली तर तिसर्‍या लाटेचा सामना ताकदीने करू शकू, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक आयसीयूचाही विचार केला पाहिजे. देशात १ लाख डॉक्टर आणि २.५ लाख नर्स असेच बसून आहेत. पण हे सर्व जण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मोठी भूमिका बजावू शकतात. एक लाख डॉक्टर्स NEET परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडे यासंदर्भात काय नियोजन आहे? असाही सवाल कोर्टाने केला.

First Published on: May 7, 2021 4:45 AM
Exit mobile version