18 ते 44 वयोगटासाठीचे डोस आता 45 वर्षांवरील लोकांसाठी; राज्य आरोग्य विभागाचा निर्णय

Covaxin Covishield

राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा असून 45 वर्षांवरील वयोगटातील पाच लाख नागरिक लसीच्या दुसर्‍या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले डोस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 84 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. केंद्राकडून 45 वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांसाठी लसी येत असून पाच लाख नागरिक कोवॅक्सिन लसीच्या दुसर्‍या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. तर कोविशिल्ड लसीच्या प्रतीक्षेत 16 लाख जण आहेत. या क्षणाला कोवॅक्सिन लसीचे केवळ 35 हजार डोसच उपलब्ध आहेत. 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिन लसीचे पावणे तीन लाख डोस उपलब्ध आहेत, तर केंद्राने दिलेले 35 हजार डोस आहेत. हे सर्व डोस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरले जाणार आहेत. याबाबत आपण केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. दुसर्‍या डोससाठी प्रतीक्षेत असलेल्यांसाठी लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे, असे टोपे म्हणाले.

राज्यात 5 लाख, 90 हजार कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जमेची बाजू म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्के आहे. शिवाय टेस्टिंग कमी झालेली नाही. दररोज दोन लाख चाचण्या होतात, याकडे टोपे यांनी लक्ष वेधले.

हाफकिनला 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर
कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सहा कंपन्यांना 3 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. हा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे.

लसीकरणाचा वेग मंदावणार
केंद्र सरकारच्या बेदखल कारभाराने देशभरात लसीकरणाची मोहीम पुन्हा एकदा मंदावण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा फटका महाराष्ट्रातील लसीकरणाला पडेल, अशी भीती टोपे यांनी व्यक्त केली. लसीच्या तुटीमुळे राज्यात आधीच रखडलेली 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम अधिकच मंदावण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे टोपे म्हणाले.

First Published on: May 12, 2021 3:45 AM
Exit mobile version