यंदा कोकणात घरोघरी जाऊन भजनं होणार नाहीत,’या’ ग्रामपंचायतीने घेतला निर्णय!

यंदा कोकणात घरोघरी जाऊन भजनं होणार नाहीत,’या’ ग्रामपंचायतीने घेतला निर्णय!

गणपती - भजन

गणेश चतुर्थी जवळ आली की कोकणी माणसांना गावाला जायचे वेध लागतात. मग हातात चार पैसे असो वा नसो. कर्ज काढून गणपतीला तो गावी जाणारच. पहाटेपर्यंत जागून वाड्या-वाडीतील घरांमध्ये जावून भजन आरती करत उत्सवाचा आनंद लुटणार. परंतु या चाकरमन्यांच्या आनंदावर यंदा  कोरोनामुळे विरजण पडणार आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही, नोकरी नाही. तसेच अर्धा पगार येत असला तरी दरवर्षी प्रमाणणे गावाला जायचे नियोजन प्रत्येक कोकणी माणूस करत आहे. पण यंदा त्याला वाड्यात अथवा वाडीत फिरुन भजन तसेच आरतीचा आनंद लुटता येणार नाही. कोरेानाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रत्येकाने आपापल्या घरातच आरती, भजन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतींनी केले आहे. त्यामुळे यंदा चतुर्थीक भजनाचे बार उडणार नसून घरच्या मंडळींसहच भजन आणि आरती करून बाप्पाची पुजा अर्चा करावी लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच त्याबाबतचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोकणातील काही ग्रामपंचायतींनी ग्रामस्थ आणि चाकरमन्यांना गणेशोत्सवाच्यादृष्टीने काही सूचना केल्या आहे. याबाबत काही ग्रामपंचायतींनी जाहीर आवाहन केले असून वैभववाडी तालुक्यातील तिथवली ग्रामपंचायतीने अशाप्रकारे परिपत्रक काढून ग्रामस्थांना आवाहन केल्याचे पत्रक हाती पडले आहे. ज्यामध्ये त्यांनी, चतुर्थीपूर्वी १५ ते १८ दिवस आधीच गावी येण्याचे चाकरमनी तसेच ग्रामस्थांच्या नातेवाईकांना कळवले आहे.  गावाला येणाऱ्या चाकरमन्यांनी ५ ऑगस्टपूर्वी गावी येण्याचे नियोजन करावे. तसेच संस्थांत्मक विलगीकरण अर्थात क्वारंटाईनची सुविधा नसलेल्या गावांमध्ये घरांमध्ये स्वतंत्र राहण्याची सुविधा असेल,अशाप्रकारे नियोजन करूनच गावी येण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

काही ग्रामपंचायतींनी गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गावात कुठेही सत्यनारायण महापुजा करण्यात येवू नये तसेच वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येवून आरती किंवा भजन करण्यात येवू नये,असेही  आवाहन केले आहे. याशिवाय  गौरी गणपतीनिमित्त करण्यात येणारी ववसा  पध्दत टाळावी,असेही म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी समुहाने एकत्र येवू नये तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच गणपती विसर्जनाच्यावतीने योग्य ते सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंग पाळतानाच विसर्जन मिरवणूका व अन्य मनोरंजनाची साधने वापरणे टाळावीत,असेही आवाहन केले आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्या लोकांना ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय काही ग्रामपंचायतींनी घेतला आहे. त्यानुसार अशाप्रकारे जर कोणी मास्कशिवाय आढळल्यास त्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचेही ग्रामपंचायतींनी स्पष्ट केले.


हे ही वाचा – ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्यासाठी पैजा, त्यामुळे नियुक्त्या रखडल्या!


 

First Published on: July 5, 2020 4:43 PM
Exit mobile version