कोरोनाची तिसरी लाट नगरमध्ये?

कोरोनाची तिसरी लाट नगरमध्ये?

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता अहमदनगर जिल्ह्यात नवी समस्या उभी राहिली आहे. तिसरी लाट नगरचा दरवाजा ठोठावत असून जिल्ह्यात कोरोनाबाधीत मुलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल पावणेचारशे मुले कोरोनाबाधित आढळली असल्याने जिल्ह्यातील धोका वाढला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, संगमनेर-अकोलेचा अपवाद वगळता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्यादेखील कमी होतांना दिसत आहे. मात्र, आता नव्याने आढळणार्‍या बाधितांमध्ये १८ वर्षाखालील मुलांचे प्रमाण लक्षणीय वाढताना दिसत असून नगरसाठी ती धोक्याची घंटा मानली जात आहे. जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील बाधितांची संख्या रविवारी आरोग्य विभागाने जाहीर केली. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या १ हजार ८५१ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पावणेचारशे रुग्ण हे अठरा वर्षाच्या आतील आहेत. त्यातही ७ ते १४ या वयोगटातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एक वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या बाधीत मुलांमध्ये बहुतांशी रुग्ण कमी तीव्रतेची लक्षणे असलेली असले तरी जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णासंख्येत संगमनेर तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असून तालुक्यात २२० रुग्ण आढळले. तर पारनेर, अकोले, नगर तालुका आणि श्रीगोंदा येथील रुग्णसंख्या दीडशेहून अधिक आहे.

First Published on: May 23, 2021 11:59 PM
Exit mobile version