Corona Crisis : सिंधुदुर्गात आढळला करोनाचा पहिला रुग्ण

Corona Crisis : सिंधुदुर्गात आढळला करोनाचा पहिला रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या रुग्णाने १९ मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसने प्रवास केला होता. एस ३ डब्यात कोरोनाचा हा पाॅॅझिटीव्ह रुग्ण होता. मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेच्या प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला यासंबंधी माहिती दिल्यानंतर कणकवली रेल्वे स्टेशनवर त्यानुसार तपासणी केली. तपासणीनंतर त्या सर्व प्रवाशांना होम कोरोनटाईनच्या सूचना दिल्या होत्या.

जिल्हा प्रशासनाने मंगलोर एक्सप्रेसमधील एस ३ या डब्यातून प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्या रेल्वे प्रवाशाच्या आईला खोकला असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेतून प्रवास केलेल्या तिच्या ‘त्या’ मुलालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांंचेही रिपोर्ट तपासणीसाठी पुण्यात पाठवले होते. गुरुवारी २६ मार्चला मिळालेल्या रिपोर्टनुसार मुलाचा रिपोर्ट पोझीटीव्ह निघाला. आईसह इतर चार जणांचे पाठविलेले रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी ही माहिती दिली. पाॅॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सापडलेला पाॅझिटीव्ह रुग्ण होम कोरोनटाईन असल्यामुळे इतर कोणाच्या संपर्कात आलेला नाही. प्रवास करताना त्याच्या सोबत आलेली त्याची बहिण २१ मार्चला मुंबईत गेली. मुंबईला जिल्हा प्रशासनाने तातडीने मुंबईच्या यंत्रणेला माहिती दिली असून बहिणीला तपासणीसाठी यंत्रणा ताब्यात घेणार आहे.

First Published on: March 26, 2020 8:09 PM
Exit mobile version