Corona: रेमडेसिवीरसाठी आता धावपळ नाही; इंजेक्शनचे दरही निश्चित

Corona: रेमडेसिवीरसाठी आता धावपळ नाही; इंजेक्शनचे दरही निश्चित

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. परंतू मध्यम व तीव्र स्वरूपाचा कोविड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. मात्र, हे औषध सहज मिळत नाही आहे. मात्र राज्यात खासगी रुग्णालयांमध्ये हे औषध लिहून दिल्यानंतर ते मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. तसंच या औषधाची किंमतही वेगवेगळी सांगितली जाते. यापासून आता रुग्णांच्या नातेवाईकांची सूटका होणार आहे. सरकारने कोरोना रुग्णांना आणि नातेवाईकांना दिलासा दिला आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेळेमध्ये आणि वाजवी दरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावं यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एका खासगी औषधी केंद्रामध्ये निश्चित दराने हे इंजेक्शन (100mg) उपलब्ध करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी या 100mg च्या इंजेक्शनची २,३६० रुपये किंमत निर्धारित करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे विस्तृत अहवाल मागवलेला होता. त्यामध्ये रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर निश्चित उपाय करण्यासाठी हे निर्देश सरकारने दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाकडून रेमडेसिवीर सहज उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील खासगी औषधी केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनची रोजची गरज निश्चित करणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांना संबधित जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या इंजेक्शन रेमडेसिवीरचा कोटा निश्चित करून तो एफडीएच्या आयुक्तांना द्यायचा आहे. यानंतर आरोग्य सेवा संचालकांना याबाबतची माहिती दिली जाणार आहे. त्यांनी या योजनेमध्ये समाविष्ट उत्पादक कंपन्यांकडून दररोज निश्चित केलेल्या दराने पाच हजार इंजेक्शन पुरवठा करायचा आहे. त्यानंतर आरोग्य सेवा संचालकांनी नेमून दिलेल्या खासगी फार्मसी स्टोअरला वितरित करण्यात येणार आहे. याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर सोपावण्यात आली आहे.


हेही वाचा – उद्योगपतींनी राजकीय पक्षांना दिली ८७६ कोटींची देणगी; ‘या’ पक्षाला सर्वाधिक देणगी


 

First Published on: October 16, 2020 9:41 AM
Exit mobile version