वादग्रस्त श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद सरकारकडून रद्द

वादग्रस्त श्रीपाद छिंदमचे  नगरसेवकपद सरकारकडून रद्द

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ठाकरे सरकारचा दणका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे तत्कालीन माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने दणका दिला आहे. छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. सहा वर्षांसाठी पद रद्द केल्याने त्यांच्या नगरसेवकपदावर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत.

भाजपकडून उपमहापौर असलेल्या श्रीकांत छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे छिंदमविरोधात राज्यभर आंदोलने झाली होती. याच कारणामुळे त्यांना आपल्या उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे छिंदम याच्यावर भाजपनेदेखील कारवाई करत पक्षातून काढले होते. आपल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे छिंदमला काही काळ नगर सोडावे लागले होते. तत्कालीन महासभेनेदेखील त्यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यासाठी हा ठराव मंत्रालयात पाठवला होता. यावर तत्कालीन नगरविकास मंत्र्यांसमोर सुनावणी सुरू होती.

नगरविकास मंत्र्यांनी दोन्ही बाजूंचे तसेच, महापालिका प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेतले. दीड-दोन वर्षांपासून ही सुनावणी सुरू होती. सध्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर निकालाची प्रतीक्षा होती. या सुनावणीवेळी प्रकृतीच्या कारणास्तव छिंदमनी उपस्थित राहण्यास नकार दर्शवित यापूर्वी सादर केलेले म्हणणे ग्राह्य धरण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंत्री शिंदे यांनी महापालिकेचे ठराव, आयुक्तांनी सादर केलेले अहवाल आणि आजवर दाखल झालेल्या कागदपत्रांचा आधार घेत अखेरीस छिंदम याचे नगरसेवकपद रद्द ठरवत सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.

यासंबंधीचा आदेश नगरविकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. छिंदमच्या ज्या नगरसेवक पदाबाबत हा निर्णय झाला त्याची मुदत संपलेली आहे. त्यानंतर पुन्हा झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपक्ष निवडून येत छिंदम दुसर्‍या टर्ममध्ये नगरसेवक झाले आहे. मात्र, नगरविकास मंत्र्याकडील अपात्रतेचा निर्णय सहा वर्षांसाठी असल्याने छिंदम यांच्या नगरसेवक पदावर गडांतर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

First Published on: February 29, 2020 5:40 AM
Exit mobile version