कापूस उत्पादकांना मोठा दिलासा; २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू!

कापूस उत्पादकांना मोठा दिलासा; २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू!

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ठप्प झालेली कापूस खरेदी परवापासून ( सोमवार) सुरू करण्यात येत असल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी दिली. विदर्भ,मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुक्यात कापूस पिकवला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह देशभरात लॉकडाऊन आहे. ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस त्यांच्या घरांमध्ये आहे. तो खरेदी करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले. लॉकडाऊन कालावधीत लागू असलेल्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार असल्याचे देखील बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा. कापूस खरेदी केंद्र आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तपणे नियोजन करावे. जे शेतकरी ऑनलाईन किंवा फोनद्वारे बुकिंग करतात त्या शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा हे त्यांना कळवले जाणार आहे. कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, रेड झोनमध्ये अर्थात हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसंदर्भातल्या काही अटी शिथिल करण्यात येणार आहेत. २० एप्रिलपासून या अटी शिथिल केल्या जातील. मात्र, असं असलं, तरी या सर्व उद्योग-व्यवसायांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. या उद्योग-व्यवसायांसोबत जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सध्या सुरू असल्याप्रमाणेच सुरू राहणार असल्याचं देखील राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

First Published on: April 18, 2020 8:43 PM
Exit mobile version