खड्डे मोजा, बक्षीस मिळवा!

खड्डे मोजा, बक्षीस मिळवा!

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात चाललेली अक्षम्य दिरंगाई आणि या मार्गावर पसरलेले खड्ड्यांचे जाळे यामुळे वाहनचालक व प्रवासी कमालीचे संतापले आहेत. ही खदखद बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या 31 जुलै रोजी वडखळपासून ते पळस्पे फाट्यापर्यंत खड्डे मोजण्याच्या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी दिली आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. येनकेन कारणाने त्यात दिरंगाई होत आहे. आता या मार्गावरील काही भाग वाहनांना जा-ये करण्यासाठी खुला करण्यात आला असला तरी त्यातील बर्‍याचशा भागाची अवस्था दयनीय झाली आहे. तेथे पडलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढणे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. दुसरीकडे इंधनाची नासाडी व तुटफूट यामुळे चालक-मालक मेटाकुटीला येत आहेत. याशिवाय काही मिनिटांचा प्रवास तासाच्या घरात पोहचला आहे. यामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांना वेळेचे गणित जमविताना नाकीनऊ येत आहेत. याचा परिणाम प्रवासी, वाहनचालकांचा संताप वाढण्यात झाला आहे.

या संंतापाला वाचा फोडण्यासाठी मनसेने ही अनोखी शक्कल लढविली आहे. तसे निवेदन पोलसानी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व एकनाथ शिंदे यांना दिले आहे. नुसता सोशल मीडियावर किंवा आपापसात संताप व्यक्त करीत बसण्यापेक्षा नागरिकांनी एकदा रस्त्यावर उतरून शासनाला कृती करण्यास भाग पाडण्याची गरज आहे. या अनोख्या स्पर्धेला ते प्रतिसाद देतील, असा विश्वास पोलसानी यांनी व्यक्त केला. निवेदन दिलेले दोन्ही मंत्री आले तर त्यांच्याच हस्ते १ ऑगस्ट रोजी पळस्पे फाटा येथे बक्षिसांचे वितरण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

First Published on: July 18, 2019 4:48 AM
Exit mobile version