त्यांच्या सुखी संसाराच्या आड आली ‘जात’!

त्यांच्या सुखी संसाराच्या आड आली ‘जात’!

एकमेकांची जात माहीत असूनही दोन अनोळखी उच्च शिक्षित तरुण आणि तरुणी शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकत्र आले…त्यांनी विवाह केला. या विवाहासाठी दोन्ही परिवार एकत्र आले होते. त्यांनी धुमधडाक्यात दोघांचा विवाह लावून दिला. परंतु, विवाहाला काही महिने होताच, दोघांचे भांडण सुरू झाले. ‘तू कनिष्ठ जातीची आहेस, तुला तुझ्या जातीची लायकी दाखवून देतो’, अशा प्रकारची जातीवाचक शिवीगाळ विवाहित तरुणीला पतीकडून करण्यात आली. सासूने आणि पतीने मारहाण केल्याचं देखील तरुणीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार सासरच्या मंडळींविरोधात २८ वर्षीय तरुणीने अॅट्रॉसिटी अंतर्गत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनघा आणि वेदांत (नावं बदललेली आहेत) यांचा विवाह गेल्या वर्षी झाला. ते दोघे एकमेकांना अनोळखी होते. त्या दोघांचे मनोमीलन शादी डॉट कॉम वरून झाले. दोन्ही परिवार एकत्र आले. दोघांची जात भिन्न होती. वेदांत हा उच्चवर्णीय होता तर अनघा ही कनिष्ठ जातीची होती. दोन्ही कुटुंबांनी जातीला महत्व न देता अनघा आणि वेदांतच्या पसंतीला महत्व दिले. दोघेही उच्च शिक्षित असून ते हिंजवडी मधील वेगवेगळ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता.


हेही वाचा – आंतरजातीय विवाहातून जन्मदात्या आईनेच केली मुलीची हत्या

व्हॅट्सअॅपवरून भांडण!

वेदांत हा व्हाट्सअॅपवर मैत्रिणीसोबत नेहमी बोलत असायचा. त्याला अनघाचा विरोध होता. अनघाच्या वाढदिवशी वेदांतने शुभेच्छा दिल्या नाहीत. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. वेदांत गोव्याला पर्यटनासाठी एकटा जायचा. त्यावरूनही दोघांमध्ये वाद झाला. वेदांतने अनघाला मारहाण करत शारिरीक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आईला सोबत घेऊन हाताने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. यावेळी बोलताना वेदांत अनघाच्या आईला म्हणला की, ‘मी तुम्हाला सभ्य समजत होतो. पण तुम्ही तर फारच घाणेरडे कनिष्ठ जातीचे निघालात (पत्नीच्या जातीचा उल्लेख करत) तुमच्या जातीची लायकी दाखवून देतो’, असं म्हणून वेदांतने जातीवाचक शिवीगाळ करत पत्नीचा आणि सासूचा अपमान केला. असे प्रकार अनेकदा घडले. दरम्यान, या घटनेप्रकरणी २८ वर्षीय अनघाने हिंजवडी पोलिसांत पती वेदांत, सासू, सासरे, दीर, मामा, मावशी यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

First Published on: May 21, 2019 3:03 PM
Exit mobile version