यंदाच्या दिवाळीत रेडिमेड किल्ल्यांची क्रेझ; किंमती अव्वाच्या सव्वा

यंदाच्या दिवाळीत रेडिमेड किल्ल्यांची क्रेझ; किंमती अव्वाच्या सव्वा

मानसी देशमुख । नाशिक

आकाश कंदील, फटाके, नवीन कपडे आणि फराळाच्या पदार्थ्यांसोबतच विद्यार्थ्यांना दिवाळीत किल्ले बनविण्याचे मोठे आकर्षण असते.काळ ओघात या कलेचे प्रमाण कमी झाले असले तरीही काही ठिकाणी टिकून आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा रेडिमेड किल्ले बाजारात दाखल झाले आहेत. या किल्ल्यांमुळे बच्चेकंपनीची हौस पूर्ण होणार असली तरीही त्यासाठी अधिकचे पैसे मात्र मोजावे लागणार आहेत.

दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. पूर्वी शहरीकरणाचा प्रभाव कमी असल्याने माती मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. परंतु, वाढत्या शहरीकरणामुळे मातीऐवजी सर्वदूर काँक्रिट दिसू लागले. परिणामी बच्चेकंपनीचा दिवाळीत किल्ले बनवण्याचा कल कमी होत गेला. नेमकी ही त्रुटी लक्षात घेत काही व्यावसायिकांनी रेडिमेड किल्ले बाजारात आणले आहेत. या किल्ल्यांना ग्राहकांची पसंतीदेखील लाभते आहे. रेडीमेड किल्ले लहान मुलांच्या प्रमुख आकर्षणाचा भाग ठरत आहेत. या किल्ल्यांच्या किमती आठशे ते हजार रुपयांदरम्यान आहेत.

पूर्वी किल्ले शेण, माती, चिकट धान्याचे पीठ यांपासून बनवले जायचे. आजच्या युगात मातीचे किल्ले बनवणे शक्य होत नसल्याने पालक चिमुरड्यांना रेडिमेड किल्ले देणे पसंत करत आहेत. रेडिमेड किल्ल्यांसोबत मावळे व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृतीदेखील उपलब्ध असल्याचे दिसून येते.

परंपरा टिकवण्यासाठी स्पर्धा

दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा टिकून राहावी यासाठी काही सामाजिक, ऐतिहासिक संस्था किल्ले बनवण्याच्या स्पर्धा आयोजित करत असतात. यात फक्त मातीचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून तयार करायला सांगितले जाते. यामुळे बक्षिसाच्या लालसेने का असेना लहान मुले किल्ले बनवायला तयार होतात.

First Published on: October 20, 2022 2:11 PM
Exit mobile version