पुण्यात खळबळ! येरवड्यातून सुटला आणि तासाभरात त्याचा जीव घेतला!

पुण्यात खळबळ! येरवड्यातून सुटला आणि तासाभरात त्याचा जीव घेतला!

धक्कादायक! लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून केला खून; गाडीखाली चिरडून काढला काटा

सध्या जगभरात सुरू असलेलं कोरोनाचं संकट राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर आता हातपाय पसरू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी असलेल्या कारागृहांमधून काही प्रमाणात कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कारागृहातली गर्दी कमी करून कोरोनाचं संभाव्य संकट टाळण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, त्याचे उलट परिणाम आता दिसू लागले असून पूर्ववैमनस्यातून या सुटलेल्या आरोपींच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याच्या बाबतीत घडलेला भीषण प्रकार याचीच साक्ष देणारा ठरला आहे. नितीन शिवाजी कसबे असं या २२ वर्षीय कैद्याचं नाव आहे.

नक्की झालं काय?

नितीन कसबे या गुन्हेगारावर पुणे आणि परिसरात मारहाणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्येच सात महिन्यांपूर्वी नितीनला पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठवलं होतं. त्याची शिक्षा सुरू असताना अचानक कोरोनाचं संकट ओढवल्यामुळे पॅरोलवर सोडण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. त्याला बुधवारी संध्याकाळी पॅरोलवर सोडण्यात आलं. त्याच्या टोळक्यातल्या एकाचा काल वाढदिवस असल्यामुळे हे सगळे जवळच्या मंदिरात नैवेद्य दाखवायला गेले होते. तिथून परतल्यानंतर हडपसरजवळच्या शादलबाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेलसमोर रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाश कानचिले आणि त्याच्या साथीदारांनी नितीन कसबेवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. गंभीर जखमी झालेल्या नितीनला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.

कारागृहातून सुटल्यानंतर काही तासांत नितीनची हत्या करण्यात आली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी आकाश कानचिले आणि त्याच्यासह एकूण १६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौघांना ताब्यात देखील घेण्यात आलं असून येरवडा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, अशा प्रकारे तुरुंगातून सुटल्यानंतर कैद्याची हत्या होण्याची ही पुण्यातली तिसरी घटना असल्यामुळे आता कारागृह प्रशासनासमोर कैद्यांना सोडण्यासंदर्भात पेच निर्माण झाला आहे.

First Published on: May 28, 2020 6:05 PM
Exit mobile version