Weather Update : शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळी पावसाचे, गारपीटीचे संकट कायम

Weather Update : शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळी पावसाचे, गारपीटीचे संकट कायम

गेल्या तीन महिन्यात राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे आत्तापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. आधीच मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी ग्रासलेला असताना आता या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने (Hail storm) शेतकऱ्याला आणखी चिंतेत टाकले आहे. यंदाच्या वर्षी गेल्या तीन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळांच्या बागांचे मोठे नुकसान केलेले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीसी उघडीप राहील. राज्यात येत्या 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत गारपीटीची देखील शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, सटाणा आणि लोहशिंगवे या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान घातले आहे. ज्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस देखील हजेरी लावू शकतो. त्यामुळे यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहेत. तर यावेळी हवामान खात्याकडून वर्तविण्यात येणारा अंदाज हा बऱ्यापैकी खरा ठरत असल्याने शेतकऱ्यांनी आपले पीक वाचविण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी नाशिकमधील बागलाण येथे अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील तिथे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तर प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या विभागात जाऊन पाहणी करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत.


हेही वाचा – Supreme Court On Menstrual Hygiene : शालेय मुलींसंबंधी सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश, ‘मोफत सॅनिटरी पॅड द्या’

First Published on: April 11, 2023 10:00 AM
Exit mobile version