पंतप्रधान मोदी चार तास झोपतात उद्धव ठाकरेंनी तेवढे तरी काम करावे

पंतप्रधान मोदी चार तास झोपतात उद्धव ठाकरेंनी तेवढे तरी काम करावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेमतेम चार तास झोप घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढा वेळ तरी काम करावे ही आमची विनंती आहे, अशी खोचक टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पुण्यात टीव्ही पत्रकाराच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर मनसेनेही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. मुख्यमंत्री कुठे आहेत? ते कधी बाहेर पडणार आहेत? कधी लोकांना दिलासा देणार आहेत?, असे प्रश्न मनसेने उपस्थित केले होते. विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना टोला हाणला होता. ‘सध्या पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या कार्यालयात बसून काम करतात. ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्रीही त्यांच्या कार्यालयात बसून सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवून आहेत. बाहेर पडून एका ठिकाणी जाण्यापेक्षा एका ठिकाणी राहून दहा ठिकाणची कामे मार्गी लागत असतील तर ते अधिक फायद्याचे आहे,’ असेही ते म्हणाले होते.

त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तात्काळ राऊतांना उत्तर दिले आहे. ‘कार्यकारी संपादक उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा,’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

‘मुख्यमंत्री घरी बसणारा नको, असा समोर येऊन लढणारा हवा,’ असे म्हणत भातखळकर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाचा फोटोही ट्विट केला आहे. दुसर्‍या एका ट्विटमधून भातखळकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. ‘आदित्यजी, आपण उपनगराचे पालकमंत्री आहात, लोक आपल्याला शोधत आहेत. कधी तरी वेळ काढून इथल्या हॉस्पिटलची, आरोग्य व्यवस्थेची पाहणी करा. लोकांची परिस्थिती ठाकरे सरकारच्या काळात किती केविलवाणी झालीय ते लक्षात येईल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: September 4, 2020 6:59 AM
Exit mobile version