हिटलरला लाज वाटेल अशा पद्धतीचे… ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका

हिटलरला लाज वाटेल अशा पद्धतीचे… ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका

मुंबई : गेल्या दोन दिवसांत विरोधी पक्षांतील अनेकांवर ‘ईडी’ने छापे मारले व काहींना अटका केल्या, पण या अशा सर्व कारवायांपासून भाजपचे अतिप्रिय गौतम अदानी (Gautam Adani) सर्व करून सवरून मोकळे आहेत. त्यांना मोदी सरकारने सुरक्षेची विशेष कवचकुंडले बहाल केली आहेत. भाजपास हजारो कोटी रुपयांच्या देणग्या अज्ञात स्रोतांकडून मिळाल्या. त्याचे मायबाप हे भ्रष्टाचारी आहेत. पी. एम. केअर्स फंड म्हणजे सरकारी फसवणूकच आहे. त्याचे साधे ऑडिट करायला कोणी तयार नाही. हिटलरला (Hitler) लाज वाटेल अशा पद्धतीचे राजकीय अमानुष हत्यासत्र सध्या सुरू आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

देशाने 1975 च्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी अनुभवली आहे. त्या काळय़ाकुट्ट कालखंडास लाज वाटावी इतक्या बेगुमान पद्धतीने भाजपचे राज्यकर्ते आज वागत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर करून राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे कार्य अखंड सुरू आहे. ही अघोषित नव्हे, तर घोषित हुकूमशाही देशात सुरू झाल्याची लक्षणे आहेत. हिटलरने ज्यूंना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारले. आता आपल्या देशात राजकीय विरोधकांबाबत तेवढेच करायचे बाकी आहे. विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखातून (Samana edit) करण्यात आली आहे.

राजकीय सुडाच्या सुपारीचे प्रकरण
महाराष्ट्रात असंख्य साखर कारखान्यांत हिशेबाचे घोळ आहेत, पण त्यातील अनेक कारखान्यांना फडणवीस-शिंदे सरकारचे अभय असल्याने ‘ईडी’ त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. मुश्रीफ यांच्याबाबत कोणीतरी सुपारी घेतल्याने त्यांच्यावर धाडी पडत आहेत. हे राजकीय सुडाच्या सुपारीचे प्रकरण आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

अदानी यांना वाचविण्यासाठी…
खेडची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सभा यशस्वी व्हावी म्हणून सदानंद कदम यांनी मेहनत घेतली व सभा संपताच पुढच्या 72 तासांत ‘ईडी’ने त्यांना अटक केली. काही व्यवहारांचे हिशेब ‘ईडी’ला लागत नाहीत व तपासात सहकार्य नाही म्हणून अटक केली जाते. मग गौतम अदानी वगैरे लोकांचे हिशेब त्यांना लागले काय? अदानी यांनी एलआयसीला साठ हजार कोटींना बुडवले. अशा सर्व बोगस कंपन्यांचे हिशेब ‘ईडी’ आणि सीबीआयला लागले काय? अदानी यांना वाचवण्यासाठी व अदानी भ्रष्टाचारावरील जनतेचे लक्ष उडवण्यासाठी विरोधकांवरील कारवाईने जोर पकडला आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

हुकूमाशाहीचा अंत होईल
या सरकारने सर्व घटनात्मक संस्था आपल्या टाचेखाली घेतल्या, निवडणूक आयोग खिशात घातला, न्यायालयात आपली माणसे नेमून घेतली. मग उरले काय? आता संविधानही बदलले जाईल किंवा हवे तसे नवे संविधान लिहून घेतले जाईल असेच वातावरण आहे. लालू यादव, मनीष सिसोदिया यांनी परखडपणे सांगितले, ”कितीही छळ करा, आम्ही गुडघे टेकणार नाही.” महाराष्ट्रात संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांनीही गुडघे टेकले नाहीत. सगळेच मिंधे नाहीत. बरेच जण स्वाभिमानी आहेत. देशाला तोपर्यंत भय नाही. या स्वाभिमानातूनच क्रांतीच्या ठिणग्या पडतील आणि केंद्रीय सत्तेकडून होत असलेला अन्याय संपून जाईल. हुकूमशाहीचा अंत होईल. इतिहास तेच सांगतो, असा विश्वासही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

First Published on: March 13, 2023 9:02 AM
Exit mobile version