ठाकरे सरकारचा शेतकर्‍यांना पुन्हा दिलासा

ठाकरे सरकारचा शेतकर्‍यांना पुन्हा दिलासा

राज्यातील शेतकर्‍यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणारा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दोन लाखापर्यंतचे कर्जमाफी जाहीर केल्यानंतर बुधवारी राज्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पीक कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कोकण आणि कोल्हापूर सांगलीतील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून या शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आली होती. अखेर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या शेतकर्‍यांना दिलासा देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार जुलै ते ऑगस्ट २०१९ च्या काळात राज्यात अतिवृष्टीमुळे विविध भागांतील पिकांचे जे नुकसान झाले. त्या शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकर्‍यांचा सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यासंदर्भात ३ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली होती. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या आधारे महाविकास आघाडी सरकारने तात्काळ निर्णय घेत सहकार विभागामार्फत याविषयीचा शासन निर्णय जारी करीत अतिवृष्टी झालेल्या शेतकर्‍यांनाही कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

First Published on: February 13, 2020 7:09 AM
Exit mobile version