तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी – काँग्रेस

तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी – काँग्रेस

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्थानिक लोकांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तसेच कोकण प्रभारी नसीम खान यांनी केली आहे.

नसीम खान यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या आंबा व केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला या तौक्ते वादळाचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करुन लवकर नुकसान भरपाई देऊन लोकांना दिलासा द्यावा, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.

 

First Published on: May 17, 2021 6:29 PM
Exit mobile version