डॉ. दाभोलकर, गौरी लंकेशची हत्या सचिन अंदुरेकडील पिस्तुलातून – सीबीआय

डॉ. दाभोलकर, गौरी लंकेशची हत्या सचिन अंदुरेकडील पिस्तुलातून – सीबीआय

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरे

पुरोगामी विचारवंताच्या हत्येचे नवनवीन खुलासे रोजच्यारोज समोर येत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून झाली असल्याचे आता समोर आले आहे. आरोपी सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आज संपत असल्याने सीबीआयने आज त्याला पुन्हा शिवाजीनगर कोर्टात हजर केले होते. यावेळी सीबीआयने ही बाब कोर्टात उघड केली. तसेच पुढील चौकशीसाठी सचिन अंदुरेची पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी असी मागणी सीबीआयने केली होती. त्याप्रमाणे कोर्टाने सचिनच्या पोलीस कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

पिस्तुलाबाबत सीबीआयचा खुलासा

आरोपी सचिन अंदुरेची अटक झाल्यानंतर सीबीआयने अंदुरेच्या मेहुण्याकडून जे पिस्तुल जप्त केले होते. त्याच पिस्तुलातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडली असल्याचा दावा सीबीआयने आज कोर्टात केला आहे. याबाबत सविस्तर अहवाल थोड्या दिवसातच जाहीर करणार असून तोपर्यंत अंदुरेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सीबीआयने केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे.

पुरोगामी विचारवंताच्या हत्येमध्ये आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीतून अनेक खुलासे होत आहेत. सनातन संस्थेचा कार्यकर्ता वैभव राऊत, अन्य हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना आतापर्यंत अटक करण्यात आली होती. त्यानंतर जे धागेदोरे हाती लागले होते त्यानुसार सचिन अंदुरेला अटक करण्यात आली होती.

 

First Published on: August 26, 2018 3:54 PM
Exit mobile version