मालेगाव-मनमाड-कोपरगाव बीओटी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा – दादा भुसे

मालेगाव-मनमाड-कोपरगाव बीओटी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा – दादा भुसे

मालेगाव-मनमाड -कोपरगाव बीओटी रस्त्याचा जो भाग नादुरुस्त आहे त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मालेगाव-मनमाड -कोपरगाव रस्त्यावर शिर्डी आणि पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून शेजारील दोन-तीन राज्यातील लोकांची रहदारी आहे. मालेगाव ते मनमाड या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नाही. मालेगाव ते मनमाड हे ३५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा अवधी लागत आहे.त्यामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण तातडीने होणे गरजेचे आहे याकडे मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

येत्या ३ दिवसात संबंधित कंत्राटदाराने नादुरुस्त रस्त्याच्या डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू करण्याच्या व येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दिल्या आहेत. त्याप्रमाणे कंत्राटदाराने कार्यवाही न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम सुरू करेल व त्याचा खर्च कंत्राटदाराकडून घेण्यात येईल अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.

यावेळी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्माकर भोसले, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

 

First Published on: September 28, 2021 3:56 PM
Exit mobile version