ऑगस्ट अखेरीस तिसर्‍या लाटेचा धोका ! यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

ऑगस्ट अखेरीस तिसर्‍या लाटेचा धोका ! यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

व्हेरिएंट

दुसर्‍या लाटेत रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासली होती. संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करतांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरीता जिल्हयात ४०० मेट्रीक टनची उपलब्धता करण्यात येत आहे. याकरीता लिक्वीड ऑक्सिजन आणि पीएसए प्लांटला मंजूरी देण्यात आली असून ऑक्सिजन अखेर हे प्लांट सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेशही प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नसतांना तिसर्‍या लाटेची घंटा वाजली आहे. लसीकरणाचा वेग पाहता तिसरी लाट अटळ असल्याचे भाकित वर्तवले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा याचा विचार करून यंदा जिल्हयात ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनची उपलब्धता करण्यात येणार आहे. यात १०६ मेट्रीक टन ग्रामीण भागासाठी तर २४० मेट्रीक टन ऑक्सिजन शहरी भागासाठी उपलब्धतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ६२ पीएसए प्लांटच्या माध्यमातून ८० मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल तर ४० जम्बो ऑक्सिजन सीलेंडरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

ऑगस्ट अखेरपर्यत सर्व यंत्रणांनी सज्जता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी ५ हजार बेडस राखीव ठेवण्यात आले आहे. बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या अहवालानूसार जिल्हयात सव्वालाख बालकं बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातील सुमारे ९५ हजार बालकं घरघुती उपचारानेच बरे होतील असेही या अहवालात म्हटले आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता खुदद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यांना सर्तकतेचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रशासनाने मिशन मोडवर कोरोना नियंत्रणासाठी तयारी सुरू केली आहे.

५ टक्केच नागरिकांचे लसीकरण
जिल्हयाची लोकसंख्या ७२ लाख ८८ हजार असून आतापर्यंत १२ लाख ८१ हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर ३ लाख ७९ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ८ लाख ५० हजार नागरिकांना अद्याप दुसरा डोस देणे बाकी आहे. एकूण टक्केवारी पाहता अवघ्या ५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झाले असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावल्याचे दिसून येते. ऑगस्ट अखेरीस लसीकरण मोहिमेला गती मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हयाचा पॉझिटिव्हीटी दर २.२ टक्के
नाशिक जिल्हयात सद्यस्थितीत १५४८ कोरोना रूग्ण असून जिल्हयाचा पॉझिटिव्हीटी दर २.२ टक्के इतका आहे. रूग्णालयातील एकूण बेडच्या २ टक्के बेडवर रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हयात ८ हजार ३२२ बेड उपलब्ध आहेत. ८ हजार ४५८ रूग्णांचा कोरोनाने मृत्यु झाला. जिल्हयाचा मृत्युदर २.१३ टक्के आहे तर राज्याचा मृत्यु दर २.१५ टक्के इतका आहे. जिल्हयात आतापर्यंत ३ लाख ९७ हजार रूग्ण बाधित झाले आहेत.

 

First Published on: July 19, 2021 12:50 PM
Exit mobile version